पीकविम्यापासून २० हजार शेतकरी वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:06 AM2019-07-16T01:06:10+5:302019-07-16T06:29:54+5:30
टीडीसीसी बँकेने गेल्या वर्षी (२०१८-१९) प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील २४ हजार ७५८ शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पीकविमा हप्तीची रक्कम भरलेली आहे.
ठाणे : टीडीसीसी बँकेने गेल्या वर्षी (२०१८-१९) प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील २४ हजार ७५८ शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पीकविमा हप्तीची रक्कम भरलेली आहे. यातील केवळ पालघर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली असून उर्वरित शेतकरी लाभापासून वंचित आहेत. एवढेच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील एकाही शेतक-यास नुकसानभरपाईची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. यामुळे ती त्वरीत देऊन त्यासाठी लावलेले निकषही स्पष्ट करावेत, अशी तंबी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दोन्ही जिल्ह्याच्या विमा कंपन्यांना दिली आहे. यामुळे विमा कंपन्याचे धाबे दणाणले आहेत.
बँकेने गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ६३६ शेतकºयांच्या १२ हजार ५६१.९० हेक्टरसाठी बँकेने ६८ कोटी ५३ लाख ५५ हजार रूपये पीककर्ज वाटप केले आहे. पण ऑगस्टपासून काही ठिकाणी अत्यल्प तर काही भागात अजिबात पाऊस पडला नाही. भात, नागली पीक काही ठिकाणी उन्हामुळे पूर्ण जळून गेले तर काही ठिकाणी पिकास लोंबीच आली नाही, काही ठिकाणी लहान लोंबी तर काहींमध्ये दाणाच भरलेला नाही. यामुळे ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन आल्याने शेतक-यांना नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. परंतु, ठाणे जिल्ह्यातील पीकविमा कंपन्यांनी शेतक-यांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवल्याने ती त्वरीत देण्यासाठी पाटील यांनी इफफो टोकीओ जनरल इन्शुरन्स कंपनीला चांगलेच धारेवर धरले आहे. गेल्या खरीप हंगामात ठाणे जिल्ह्यातील कर्जदार तसेच बिगरकर्जदार १४ हजार १८७ शेतक-यांनी त्यांच्या ११ हजार ९७.५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचा विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत काढला आहे. मात्र, शेतकºयांना या विम्याव्दारे अद्यापही भरपाई मिळाली नसल्याचे पाटील यांनी विमा कंपनीच्या निदर्शनास आणून दिले.