‘स्पीड गन’मुळे २० हजार वाहनांना ब्रेक! वर्षभरात दोन कोटी ७१ हजारांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 11:52 PM2021-01-29T23:52:47+5:302021-01-29T23:53:03+5:30
ठाणे वाहतूक पोलिसांची कारवाई, चारच दिवसांपूर्वी ठाण्यातील उपवन येथेही एका महिला चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातामध्येही सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
जितेंद्र कालेकर
ठाणे : भरधाव वाहने चालविणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेने बडगा उगारला आहे. ‘स्पीड गन’ असलेल्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत २०,७१ वाहन चालकांकडून दोन कोटी ७१ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.
रस्ता मोकळा मिळो अथवा न मिळो, अत्याधुनिक मोटारी व दुचाकी वेगात चालवल्या जातात. काही अपवाद वगळता कधी कधी तर नाहक ती जोरदार वेगाने पळविली जातात. त्यामुळे अनेकदा अपघात होतो. यात कधी रस्त्यात आलेल्या दुसऱ्या वाहनाला किंवा एखाद्या पादचाऱ्याला चुकविताना हे अपघात होतात. त्यामुळे ब्रेकऐवजी अॅक्सिलेटरवर जोर लावल्यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटते. त्यातच अनेकदा चालक किंवा सह प्रवाशाला जीव गमवावा लागतो.
चारच दिवसांपूर्वी ठाण्यातील उपवन येथेही एका महिला चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातामध्येही सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ठाण्यात शहर वाहतूक पोलिसांकडून अशा शहरांतर्गत आणि राष्ट्रीय महामार्गावर दोन वेगवेगळ्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे नजर ठेवली जाते. यात वाहनाचा वेग, वेळ आणि क्रमांकही अचूक टिपला जातो. दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेग आढळल्यानंतर थेट ई-चालानद्वारे ही कारवाई केली जाते, अशी माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
धावत्या वाहनांचा मोजला जातो वेग
भरघाव वाहन चालविणाऱ्यांवर इंटरसेप्टर वाहनांमधील स्पीड गनद्वारे लेझरने पॉइंट आऊट केले जाते. त्यातून वाहनाचा वेग, तसेच चालक आणि सहप्रवाशाने सीटबेल्ट लावला की नाही, हेही पडताळले जाते. विहित मर्यादेपेक्षा जास्त वेग असेल तर संबंधितांवर ई-चालानद्वारे ऑनलाइन कारवाई केली जाते, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
अति वेगामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात होतात. शहरात ताशी ३० ते ४० किमी, राष्ट्रीय महामार्गावर ताशी ७० ते ८० किमीचा वेग अपेक्षित आहे. तो नसल्यास अशा वाहनांवर स्पीड गनद्वारे एक हजार रुपये दंडाची कारवाई केली जाते. - बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा