सव्वावर्षात कोरोनाचे २००५ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:30 AM2021-06-02T04:30:04+5:302021-06-02T04:30:04+5:30
कल्याण : सद्य:स्थितीला कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली घट ही समाधानाची बाब असली, तरी ...
कल्याण : सद्य:स्थितीला कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली घट ही समाधानाची बाब असली, तरी गेल्या सव्वावर्षात (१५ महिने) कोरोनामुळे २००५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यूचे प्रमाण कमी होते; परंतु दुसऱ्या लाटेत मात्र मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. मे महिन्यात तब्बल ५७१ जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. काही महिन्यांपूर्वी एक टक्क्याहून कमी असलेला मृत्यूदर सध्या १.५१ पर्यंत पोहोचला आहे.
केडीएमसीच्या हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्च २०२० रोजी सापडला. १४ मार्च ते ८ जून या लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या एक हजार ५६२ होती. यातील ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता; परंतु ९ जूनपासून सुरू झालेल्या अनलॉकनंतर रुग्णसंख्या वाढतच गेली. सप्टेंबर महिन्यापर्यंत रुग्णसंख्येने ४० हजारांचा पल्ला गाठला होता. जुलै महिन्यात सर्वाधिक १३ हजार ३९२ रुग्ण आढळले होते. यातील १२ जुलैला एका दिवसात तब्बल ६६१ रुग्ण आढळून आले होते. अनलॉकनंतर रोज सरासरी ९ ते ११ असे मृत्यू व्हायचे. हे रेकॉर्ड दुसऱ्या लाटेने मोडले. दुसऱ्या लाटेतील एप्रिल महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच तब्बल ४१ हजार ५५१ नवे रुग्ण आढळून आले, तर १७८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. एप्रिलच्या मध्यापर्यंत ४ ते ५ रुग्णांचा मृत्यू व्हायचा; परंतु २१ एप्रिलपासून यात वाढ होऊन मृतांचा आकडा १३ पर्यंत पोहोचला होता. मे महिन्यात तर मृतांच्या आकड्याने कहरच केला. त्यावेळी दररोज २० ते २४ जणांच्या मृत्यूंची नोंद होत होती. २३ मे रोजी मृतांचा आकडा २४ इतका होता. ही मृतांची आजवरची सर्वोच्च संख्या आहे. महत्त्वाचे म्हणजे महिनाभरात तब्बल ५७१ मृत्यूंची नोंद झाली आहे. केडीएमसीच्या हद्दीत गेल्या १५ महिन्यांत १ लाख ३३ हजार ४५ रुग्ण आढळून आले असून, १ लाख २९ हजार ७९ इतके रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत, तर २ हजार ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
--------------------------------------------
जवळची माणसे गमावली
कोरोनाच्या लाटेत अनेकांनी जवळची माणसे गमावली. कोरोनाबाधितांची अविरत सेवा करणाऱ्या काही डॉक्टरांसह नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांनाही प्राणांना मुकावे लागले. लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांचाही कोरोनाने बळी घेतल्याचे पाहायला मिळाले. केडीएमसीतील दोन लोकप्रतिनिधींसह राजकीय पक्षांचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक कलावंत व तीन पत्रकारांचाही कोरोनाने मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे.
--------------------------