ठाण्यात २००५ नळजोडण्या खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:44 AM2021-01-16T04:44:09+5:302021-01-16T04:44:09+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेने पाणीबिलांची थकबाकी ठेवणाऱ्या थकबाकीदारांवर पुन्हा कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. यानुसार मागील ...
ठाणे : ठाणे महापालिकेने पाणीबिलांची थकबाकी ठेवणाऱ्या थकबाकीदारांवर पुन्हा कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. यानुसार मागील १५ दिवसांत पाणीपुरवठा विभागाने २८८ नळजोडण्यांसह आतापर्यंत तब्बल २,००५ नळजोडण्या खंडित केल्या आहेत. याशिवाय ८४ पंप रूम सील करून ३५५ पंप जप्त केले आहेत.
ठाणे महापालिकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पाणीदेयके तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत नळसंयोजन खंडित करून पाणीपुरवठा बंद करणे, जप्तीची कारवाई करणे, पंप रूम सील करणे, पंप जप्त करणे अशी कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार मागील १५ दिवसांत २८८ नळजोडण्या खंडित करून पाणीपुरवठा बंद केला आहे. तसेच सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत एकूण २,००५ नळजोडण्या खंडित केल्या असून ८४ पंप रूम सील तर ३५५ पंप जप्त केले आहेत. तरी नागरिकांनी पाणीबिलांचा एकरकमी भरणा करून ३१ जानेवारीपर्यंत थकबाकीवरील १०० टक्के प्रशासकीय आकारामध्ये देण्यात येणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊन होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. तसेच ज्यांचे नळ संयोजन खंडित केलेले आहेत त्यांनी परस्पर पुन्हा नळजोडणी केली तर अशांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही दिला आहे.
- पाणीबिलांची यंदा ९० काेटी वसुली
पाणीपुरवठा विभागाने आजच्या तारखेपर्यंत ९० कोटींची पाणीबिलांची वसुली केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ८६ कोटींची वसुली केली होती. परंतु, यंदा कोरोनाकाळ असतानाही पाणीपुरवठा विभागाने चार कोटींची जास्तीची वसुली केली आहे.
........
थकबाकीदारांनी दिलेल्या निर्धारित वेळेत आपली देयके अदा करून महापालिकेस सहकार्य करावे. अन्यथा नळसंयोजन खंडित केले जाणार आहे. शिवाय ३१ जानेवारीपर्यंत थकबाकीवरील १०० टक्के प्रशासकीय आकारामध्ये सवलत दिलेली आहे. त्यामुळे त्याचाही लाभ थकबाकीदारांना घेता येणार आहे.
(- विनोद पवार, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग)