१२ तासांत लिहिल्या २०७ कविता; दिनेश गुप्ता यांची अटलजींना आगळीवेगळी श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:43 AM2018-08-25T00:43:00+5:302018-08-25T06:54:15+5:30
गुप्ता यांनी शुक्रवारी १२ तासांत २०७ कविता लिहून अटलजींना एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली.
कल्याण : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देश हळहळला. ही हळहळ एखाद्या कविमनाला कशी हेलावून टाकते, त्याच्यातील संवेदनशील मन कसे काय त्याला बोलते करते, याचा उत्तम प्रत्यय प्रा. दिनेश गुप्ता यांच्या रूपाने आला. गुप्ता यांनी शुक्रवारी १२ तासांत २०७ कविता लिहून अटलजींना एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली.
सार्वजनिक वाचनालयातर्फे ‘काव्यलेखनाची काव्यमय श्रद्धांजली’ या कार्यक्रमांतर्गत गुप्ता यांनी हा विक्रम केला आहे. अटलजी कवी असल्याने त्यांना समर्पक व साजेशी ही आदरांजली वाहण्यात आली. वाजपेयी यांच्या कविता प्रेरणादायी व आशादायी विश्वास निर्माण करणाऱ्या होत्या. अटलजींच्या ‘हार नही मानूंगा’ व ‘विश्वासअटल’ या कवितेतील काही शब्दांमुळे गुप्ता यांना प्रेरणा मिळाली. त्यातून त्यांनी २०७ कविता रचल्या. कविता करताना एखादा विषय घेऊन कविता न करता समोर येईल तो विषय, असे मानून त्यांनी कविता केल्या. रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत काम करणारी व्यक्ती समोर आली, तरी त्यांनी त्याच्यावर कविता रचली. या विक्रमासाठी कोणतीही पूर्वतयारी गुप्ता यांनी केली नव्हती. यापूर्वी त्यांनी ९ आॅगस्टला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ८० कविता लिहिल्या होत्या. हा अनुभव गाठीशी असल्याने १२ तासांचा काव्यलेखनाचा प्रपंच करण्याचा त्यांचा मानस होता. तो त्यांनी शुक्रवारी प्रत्यक्षात आणला.
गुप्ता यांच्या या विक्रमाची नोंद गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. हा विक्रम नोंदवण्यासाठी या रेकार्डचे अधिकारी आलोककुमार सार्वजनिक वाचनालयात आले होते. गुप्ता यांना त्यांनी गोल्डन बुक आॅफ रेकार्डचे प्रमाणपत्र बहाल केले.
‘अटलविश्वास’ प्रकाशित करण्याचा मानस
गुप्ता हे ४० वर्षांपासून कविता लिहित आहेत. २०७ कविता लिहिताना गुप्ता यांनी केवळ १५ मिनिटांचा ब्रेक घेतला. या कविता ‘अटलविश्वास’ या काव्यसंग्रहाच्या नावाने प्रकाशित केल्या जाणार आहेत. त्याला प्रकाशक मिळताच त्याचे प्रकाशन यथोचित समारंभात केले जाईल, असे गुप्ता यांनी त्यावेळी सांगितले.