मीरा-भार्इंदरमध्ये २०७० बाप्पांना उत्साहात निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:00 AM2018-09-25T03:00:45+5:302018-09-25T03:00:50+5:30
मीरा-भार्इंदरमध्ये रविवारी २०७० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यासाठी महापालिकेने विसर्जनाची चोख व्यवस्था केली होती.
मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये रविवारी २०७० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यासाठी महापालिकेने विसर्जनाची चोख व्यवस्था केली होती. २४ विसर्जन ठिकाणी १६९९ घरगुती, तर ३७१ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सोमवारी पहाटे साडेचारपर्यंत भार्इंदर पश्चिमेला, तर पूर्वेला साडेपाचपर्यंत विसर्जन सुरू होते. मोठा पोलीस बंदोबस्त तसेच ड्रोन कॅमेऱ्याने विसर्जनव्यवस्थेवर नजर ठेवण्यात आली.
मीरा-भार्इंदरमध्ये विसर्जनासाठी दोन उपअधीक्षक, आठ निरीक्षक, ४० सहायक आणि उपनिरीक्षक, ३५० महिला आणि पुरुष पोलीस, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तर तीन दंगल नियंत्रण पथके असा सुमारे साडेचारशेपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. मदतीसाठी होमगार्ड, ट्रॅफिक वॉर्डनसह एनसीसी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांचे सहकार्य पोलिसांनी घेतले होते. विसर्जन मिरवणूक आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर १०० सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोनच्या मदतीने आकाशातून विसर्जन मिरवणूक व स्थळांवर नजर ठेवण्यात आली. महापालिकेने विसर्जनासाठी २४ ठिकाणी व्यवस्था केली होती. यात शिवार उद्यान येथील एक कृत्रिम तलाव, १५ तलाव, सहा खाडीकिनारे, प्रत्येकी एक चेणे नदी आणि उत्तन समुद्रकिनारी व्यवस्था केली होती. पालिकेने विसर्जनासाठी पोहणारे तरु ण तसेच तराफ्यांची सोय केली होती. भार्इंदर जेसल पार्क, घोडबंदर येथे खाडीकिनारी ३५ बोटी ठेवल्या होत्या. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी हायड्रा, फोर्कलिफ्ट आदींची व्यवस्था केली होती. शिवाय विद्युत रोषणाई, आरतीसाठीदेखील प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती. डीजेला परवानगी नसल्याने बहुतांशी भाविकांनी पारंपरिक ढोलताशांच्या तालावरच बाप्पाला निरोप दिला. मध्यरात्रीनंतर मिरवणुकांची वाद्ये बंद करण्यात आल्यानंतर मिरवणूक विसर्जनस्थळी नेण्यासाठी पोलीस घाई करत होते. भार्इंदरच्या काशीनगर येथील जय भवानी जय शिवाजी मंडळाने तर ढोलताशांच्या आवाजालासुद्धा कात्री लावत भजन म्हणत मिरवणूक काढली.
विसर्जन मार्गांवर प्लास्टिक, खरकटे
यंदा भार्इंदर पूर्व, पश्चिम आदी भागांतील मुख्य विसर्जन मार्गांवर खाद्य व पेयपदार्थ स्टॉल, स्वागत कक्षांच्या मंडपांना पोलिसांनी परवानगीच नाकारली होती. त्यामुळे पालिकेनेदेखील परवानगी दिली नाही. तरीही येथे अनेक स्टॉल्स होते. या फुकट खाद्यपेयवाटप स्टॉलमुळे गर्दी होऊन विसर्जनात अडथळा होतो, चेंगराचेंगरीही होते. तरीदेखील पालिका व लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने बेकायदा मंडप लागले. पालिकेने त्यावर काहीच कारवाई केली नाही. परिणामी, विसर्जन मार्गांवर गर्दी होऊन कोंडी झाली. शिवाय, खाद्यपेय वाटणाºया संस्थांनी सर्रास प्लास्टिकचा वापर केला. प्लास्टिक ग्लास, पिशव्या, चमचे यासह उरलेले अन्न तसेच टाकून गेले. त्यामुळे रस्त्याला उकिरड्याचे स्वरूप आले होते.
भिवंडीत १२९ सार्वजनिक गणपतींना निरोप
भिवंडी : ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळण करत गणेशभक्तांनी भावपूर्ण वातावरणात १० दिवसांच्या गणपतीला रविवारी निरोप दिला. दरवर्षीप्रमाणे हिंदुस्थान मशिदीच्या ट्रस्टींनी आणि मुस्लिमबांधवांनी पुष्पवृष्टी करत गणेशभक्तांचे स्वागत केले. शहरातील मुख्य मिरवणुकीत तामीळबांधव सामील झाले होते. त्यांच्या गळाचा गणपती मिरवणुकीचे आकर्षण ठरले. रविवारी सकाळपासून सोमवारी पहाटेपर्यंत २५०० घरगुती व १२९ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.
गणेशमूर्तींची मिरवणूक पाहण्याकरिता मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. गुलाल उधळत बॅण्जो व ढोलताशांच्या तालावर मोठ्या संख्येने तरुण व महिला नाचत होत्या. अनंत चतुर्दशीची मुख्य मिरवणूक शहरातील बाजारपेठेमधून जाते. परंतु, बाजारपेठेमधील दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने मोठ्या उंचीच्या गणेशमूर्तींना या मार्गावरून जाण्यास अडथळा निर्माण झाला होता. शहरातील हिंदुस्थान मशिदीचे ट्रस्टी मुश्ताक मोमीन आणि मुस्लिमबांधवांनी मशिदीसमोरून जाणाºया गणेशभक्तांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. याप्रसंगी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह सहअप्पर आयुक्त सत्यनारायण, पोलीस उपायुक्त अंकित गोयल, सहा. पोलीस आयुक्त खंडेराव धरणे व भोईवाडा पोलीस निरीक्षक विजय भिसे यांच्यासह शांतता कमिटी सदस्य व गणेश महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. गणेशभक्तांच्या स्वागतासाठी महापालिकेने शिवाजी चौकात उभारलेल्या स्वागतमंचावरून महापौर जावेद दळवी, आयुक्त मनोहर हिरे, खा. कपिल पाटील, आ. महेश चौघुले यांनी गणेशभक्तांचे स्वागत केले. मिरवणूक मार्गावरील गर्दीचे नियंत्रण करण्याकरिता अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी मदत केली. गणेशभक्तांसाठी परोपकार संस्थेने वडापावचे वाटप केले, तर राठी परिवाराने पाण्याचे वाटप केले. तसेच जय मातादी ग्रुप व रोटरी क्लब आॅफ भिवंडी यांनी चहाचे वाटप केले. शहरालगत कामवारी नदीत सकाळी साडेअकरापासून सुरू झालेले गणेशमूर्तींचे विसर्जन पहाटे साडेतीन वाजता संपले. कामतघर येथे वºहाळाघाट, गणेशघाट व फेणेघाटावर मोठ्या संख्येने गणेशभक्तांनी विसर्जनासाठी गर्दी केली होती.
अंबरनाथ तालुक्यात सहा हजार गणेशमूर्तींचे विसर्जन
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषद हद्दीतील सहा हजार ९५ गणेशमूर्तींचे विसर्जन शांततेत करण्यात आले. त्यात ८८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचा समावेश होता.
अंबरनाथ तालुक्यात १० दिवसांच्या गणेशाचे विसर्जन शांततेत झाले. घरगुती गणेशाचे विसर्जन रात्री १० च्या आत करण्यात आले. मात्र, सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन रात्री २ वाजेपर्यंत सुरू होते. अंबरनाथ शहरात कैलासनगर येथील तलावात विसर्जन करण्यात आले. तर, सर्वाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन चिंचपाडा येथील तलावात झाले. या दोन्ही ठिकाणी विसर्जनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी खाजगी क्रेनची सोय करण्यात आली होती.
बदलापुरात उल्हास नदीपात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नदीसोबत गावदेवी तलावातही गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मंडळांची गर्दी झाली होती. या दोन्ही ठिकाणी भाविकांची गर्दी होती.