पालघरात वाटले २१ कोटींचे मुद्रा कर्ज
By admin | Published: October 6, 2016 02:36 AM2016-10-06T02:36:54+5:302016-10-06T02:36:54+5:30
मुद्रा कर्ज योजना जिल्ह्यातील तरुण व्यावसायिकांसाठी संजीवनी ठरली असून सुमारे ४५०० लाभार्थ्यांनी सुमारे २१ कोटी रुपयांचा लाभ घेतला आहे.
हितेन नाईक/ निखिल मेस्त्री, पालघर/ नंडोरे
मुद्रा कर्ज योजना जिल्ह्यातील तरुण व्यावसायिकांसाठी संजीवनी ठरली असून सुमारे ४५०० लाभार्थ्यांनी सुमारे २१ कोटी रुपयांचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यात शिशु गटामध्ये ३८५१ लाभार्थ्यांना ८ कोटी, किशोर गटात ३३१ जणांना ६.६० कोटी तर तरुण या गटात ८७ लाभार्थ्यांना ६ कोटी कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
या मुद्रा योजनेचे व्यवसायाच्या स्वरूपाने शिशु, किशोर व तरुण असे तीन प्रकार असून व्यवसायाच्या व्यापाकतेनुसार या प्रकारात रोजगाराच्या साधनांवर कर्ज ठरवले जाते. या योजनेमध्ये शिशु कर्जाअंतर्गत लाभार्थी ५ ते ५० हजारापर्यंत, किशोर कर्जाअंतर्गत ५० हजार ते ५ लाखांपर्यंत व तरु ण कर्जाअंतर्गत ५ लाखांपासून ते १०लाखांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. योजनेच्या निकषाप्रमाणे हे कर्ज व्यवसायासाठी लाभाथ्यांना दिले जात असून हे कर्ज विनाअनुदानीत तत्वावर असून लाभार्थ्यांना ही कर्जे शहानिशा करून तात्काळ वाटप केली जातात.
या योजनेत दिलेले मुद्राकार्ड मुख्यत: कृषि क्षेत्राच्या व्यतिरिक्त व्यवसाय उद्योग करण्यासाठी देण्यात येत होते. परंतु नुकतेच कृषि क्षेत्राला पूरक असणाऱ्या व्यवसायासाठीही या अंतर्गत कर्ज मिळणार आहे. छोटे व्यवसाय जसे भाजीपाला विक्री, स्टेशनरी दुकान, झेरॉक्स मशीने, खानावळ, ब्युटी पार्लर, खाद्य पदार्थ विक्री करणारी गाडी टाकणे, पोल्ट्री फार्म, सेवा देणारा उद्योग अशा प्रकारचा कुठलाही लघु उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजने अंतर्गत कर्ज उपलब्ध करु न देण्यात येते. या मुद्रा योजनेचा लाभ जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खाजगी बँका, पतसंस्थांमधून घेता येईल. (वार्ताहर)
जिल्ह्यातील शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही ही योजना प्रभावीपणे राबविली पाहिजे.जिल्ह्यातील आदिवासी भागात मुद्रा कर्ज योजनेचा हवा तसा प्रभाव नाही. जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची गरज असून यासाठी जिल्हास्तरीय दिशा समितीत याबाबतचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांकडून व संबंधित बँकांकडून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत आजतागायत दिलेली कर्जे ही खूपच कमी आहेत याउपर जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना या योजनेत सहभागी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- चिंतामण वनगा, खासदार
मुद्रा कर्ज योजना प्रशंसनीय असून या योजनेला आणखीन मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन तिचा प्रचार करणार असून कौशल्य विकास कार्यक्रमाबरोबरीं विकासाची संधी उपलब्ध होण्यासाठी मुद्रा योजनेची आवश्यकता आहे. गरजूंनी या मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. आतापर्यंत वाटप केलेल्या कर्जापेक्षा जास्त लक्षांक लाभ याअंतर्गत द्यावयाचा असून बँकांना यासाठी टार्गेट देण्याचे विचाराधीनही आहे.
- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी
ही योजना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी चांगली आहेच. लाभार्थी व बँकर्स यामध्ये योग्य समन्वय व निकटता असल्यास ही योजना व्यवस्थित फलद्रुप होऊन गरजू, होतकरू व बेरोजगार स्वत:च्या पायावर उभे राहतील.
- अनिल.बा.सावंत, व्यवस्थापक (जिल्हा अग्रणी बँक)