कळवा रुग्णालयातील २१ तर महापालिकेच्या आरोग्य विभागातील पाच अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 03:45 PM2020-05-21T15:45:55+5:302020-05-21T15:46:22+5:30
कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतांना आरोग्य सेवा देणाऱ्या कळवा हॉस्पीटलमधील तब्बल २१ जणांना आता कोरोनाची लागण झाली आहे. तर येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागातील पाच जणांनाही आता कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ठाणे : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून आता ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आतापर्यंत तब्बल २१ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे यातीलच एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाशी लढा देणारा हा विभागच आता सील करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील ३५ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही होम क्वॉरान्टाइन करण्यात आले आहे.
शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. परंतु त्यांच्यावर उपचार करणारेच वैद्यकीय अधिकारी देखील आता या कोरोनाच्या विळख्यात सापडण्यास सुरवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी कळवा रुग्णालयातील चार ते पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता हा आकडा थेट २१ वर जाऊन पोहचला आहे. यामध्ये ८ ते १० वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर उर्वरीत वैद्यकीय कर्मचाºयांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे येथील तीन ते चार विभाग सध्या सील करण्यात आल्याची माहिती डॉ. आर. टी. केंद्रे यांनी दिली. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयातील चवथ्या मजल्यावरील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर हा विभाग एक दिवस सील करुन निर्जंतुकीकरण करण्यात आला होता. आता, मात्र आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कळवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कोरोना बाबतच्या मिटींगसाठी महापालिका मुख्यालयात येत होते, त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्यांच्या संपर्कात आलेल्या आरोग्य विभागातील दोन वैद्यकीय अधिकारी आणि अन्य तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर ३५ जणांनाही आता होम क्वॉरन्टाइन करण्यात आल्याचेही केंद्रे यांनी स्पष्ट केले. आता चवथा मजल्यावरील आरोग्य विभाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे. दरम्यान आता कळवा रुग्णालयातील त्या वैद्यकीय अधिकाºयाच्या पालिकेने अनेक महत्वाचे अधिकारी, कर्मचारी देखील संपर्कात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्याही चाचण्या येत्या काही दिवसात केल्या जाणार असल्याचेही बोलले जात आहे.