दूषित पाण्यामुळे २१ जण रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:27 AM2018-05-16T03:27:26+5:302018-05-16T03:27:26+5:30
पिण्यासाठी पाणीच मिळत नसल्याने आणि त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने डोंगरातील एका विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने अंबरनाथ पश्चिमेकडील जावसई परिसरातील ठाकूर पाड्यातील २१ आदिवासींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंबरनाथ : पिण्यासाठी पाणीच मिळत नसल्याने आणि त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने डोंगरातील एका विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने अंबरनाथ पश्चिमेकडील जावसई परिसरातील ठाकूर पाड्यातील २१ आदिवासींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाणी खराब आहे हे ठाऊक असूनही तहानलेल्या आदिवासींनी ते प्यायल्याचे उघड झाले.
पाणी प्यायल्यावर मंगळवारी पाड्यातील २१ आदिवासींना उलट्या, चक्कर आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे महिला आणि लहान मुलांन छाया रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे आदिवासींमध्ये घबराट पसरली आहे.
आॅर्डिनन्स कंपनीच्या मागच्या बाजूस असलेल्या जावसई परिसरात उंच इमारती उभ्या रहात आहेत. याच इमारतींपासून हाकेच्या अंतरावर आदिवासी ठाकूरपाडा वसलेला आहे. काही महिन्यांपूर्वी उभारलेल्या या उंच इमारतींना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या तेथे अनेक वर्षांपासून रहात असलेल्या या आदिवासी पाड्यांपर्यंत मात्र पोहोचू शकलेल्या नाहीत. त्यामुळे ठाकूरपाड्यातील आदिवासींना हंडाभर पाण्यासाठीही डोंगरावरील धोकादायक विहिरींकडे पायपीट करावी लागते. या भागात नगरपालिकेने विहीर बांधून दिली आहे. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसात ही विहीर तळ गाठते. मात्र, येथील चारशे नागरिकांच्या वस्तीला पिण्यासाठी पाण्याचा अन्य कोणताही स्त्रोत उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून या विहिरीतील दूषित पाणी काढावे लागते आणि तेच पिण्यासाठी वापरावे लागते. हेच दूषित पाणी प्यायल्याने मंगळवारी या ठाकूर पाड्यातील २१ नागरिकांना चक्कर येणे, डोके दुखणे, उलट्यांचा त्रास होऊ लागला. एकापाठोपाठ पाड्यावरील सर्वांना हा त्रास हऊ लागल्याने खळबळ उडाली. याच भागातील सामाजिक कार्यकर्त्या जयश्री गुप्ता यांना माहिती मिळताच त्यांनी त्यांना छाया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास मदत केली. ते कळताच नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनीही रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. ठाकूरपाड्यात पाण्याचा टँकरही पाठवण्याची व्यवस्था केली. आरोग्य सभापती रवींद्र पाटील, नगरसेवक शशांक गायकवाड यांनी पाड्याला भेट दिली. तेथील विहिरीची पाहणी केली. पाण्याच्या सुविधेसाठी सभागृहात विषय मांडणार असल्याचे सांगितले.
>पाणीटंचाईचे भीषण वास्तव उघड
दूषित पाण्याची बाधा झाल्याने या वस्तीतील पाणीटंचाईचे भीषण वास्तव उघड झाले आहे. एकीकडे अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती-चोरी होते. ती प्रशासनाला रोखता येत नाही. त्याचवेळी पिण्यासाठी पाणीही न मिळणाºया वस्त्या जर शहरात असतील आणि पाणी खराब आहे हे डोळ््यांना दिसत असूनही त्यांना ते पाणी पिण्यावाचून अन्य कोणताही मार्ग नसेल तर पालिकेचे प्रशासन नेमके काय करते आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
>पाण्याच्या समस्येवर अनेकदा नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांची भेट घेऊन मोर्चेही काढले आहेत. परंतु आमच्या पाणीटंचाईकडे नगरपालिका, लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने जनावरेही पिणार नाहीत, असे दूषित पाणी आम्हाला प्यावे लागते.
- कांता घायल, रहिवासी, ठाकूरपाडा