ठाण्यात निर्माण होणार २१ थीम पार्क
By admin | Published: August 28, 2015 12:14 AM2015-08-28T00:14:12+5:302015-08-28T00:14:12+5:30
महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी आणि खऱ्या अर्थाने ठाण्याला स्मार्ट शहर बनविणारी जवळपास २१ थीम पार्क लवकरच ठाणे शहरात साकार होणार आहेत. ही थीम पार्क पीपीपी
ठाणे : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी आणि खऱ्या अर्थाने ठाण्याला स्मार्ट शहर बनविणारी जवळपास २१ थीम पार्क लवकरच ठाणे शहरात साकार होणार आहेत. ही थीम पार्क पीपीपी, बीओटी, प्रायोजकांमार्फत तर काही पालिका स्वत: उभारणार आहे. गुरुवारी या योजनांच्या संकल्पचित्रांना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ग्रीन सिग्नल दिला. येत्या वर्षभरात ती साकारण्याचा पालिकेचा मानस आहे.
ठाणे शहरात थीम पार्क बनविण्यासाठी महापालिकेने आठ उद्यानविशारदांची नेमणूक केली असून त्या सर्वांनी आयुक्तांसमोर त्यांनी बनविलेल्या संकल्पचित्रांचे सादरीकरण केले. या थीम पार्कमध्ये बाराबंगला, वर्तकनगरमधील लक्ष्मी पार्क, जवाहरबाग येथील नेहरू बालोद्यान, सावरकरनगर येथील नाना-नानी पार्क, कावेसर, उथळसर येथील डॉ. सलीम अली ऋतुचक्र उद्यान, केदारेश्वर मंदिर उद्यान, लोकमान्यनगर पाडा नं. ४ येथील उद्यान, कोलशेत तलाव, पारसिकनगर, माजिवडा-मानपाडा, वडवली, खारेगाव, रूणवाल प्लाझा, वर्तकनगर आदीसह एकूण २१ ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार आहे.
ही थीम पार्क बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी), लोकसहभागातून (पीपीपी) आणि महापालिका निधी अथवा प्रायोजकाच्या माध्यमातून निर्माण करण्यात येणार असून या थीम पार्कमध्ये फूड कोर्ट, मनोरंजनाची साधने, अॅम्फीथिएटर, संगीताची साधने, लहान मुलांसाठी गेम झोन, छोटे मलनि:सारण प्रक्रिया प्रकल्प, हरित कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प आदी अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने एंजल्स पॅराडाइज, स्मृतीवन, जॉगर्स पार्क, जुने ठाणे, बॉलीवूड यासह अनेक विविध थीम योजनांचा समावेश आहे.
उद्यान विशारदांनी सादर
केलेल्या सर्व संकल्पचित्रांना आयुक्तांनी मान्यता दिली असून या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी, याबाबत येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर, एका वर्षाच्या आत ठाणेकरांना हे थीम पार्क भेटीला येणार आहे.
या थीम पार्कयोजनेमुळे ठाणे शहरातील अस्तित्वात असलेल्या उद्यानांचा चेहरामोहरा बदलणार असून त्या ठिकाणी आता नियोजनबद्ध पद्धतीने विविध सांस्कृतिक, क्रीडा, मनोरंजनाची साधने नागरिकांसाठी निर्माण करण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे हरित ठाण्याचे चित्र अधिक समृद्ध होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. (प्रतिनिधी)