महापालिका कर्मचाऱ्यांना २१ हजार ५०० सानुग्रह अनुदान
By अजित मांडके | Published: November 6, 2023 06:56 PM2023-11-06T18:56:00+5:302023-11-06T18:56:21+5:30
आशा सेविकांना दिवाळी भाऊबीज भेटमध्ये २० टक्के वाढ; पालिकेवर पडणार २० कोटींचा बोजा
ठाणे : ठाणे महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासह परिवहन सेवेतील कर्मचाºयांसह महापालिकेतील कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २१ हजार ५०० व कंत्राटी इतके सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. सानुग्रह अनुदानात भरघोस अशी वाढ करुन ठाणे महापालिका अधिकारी कर्मचारी यांची दिवाळी गोड केल्याबद्दल माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पालिका कर्मचाºयांना अडीच हजारांची वाढ सानुग्रह अनुदानात मिळाली आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीवर सुमारे २० कोटींचा बोजा पडणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेत महापालिकेचे ६५०९, शिक्षण विभागाचे ६९७, महापालिका कंत्राटी ७३, अनुकंपा ६६ व इतर २३३ असे ७ हजार ५७८ कर्मचारी कार्यरत आहेत. तर परिवहनचे सुमारे १६०० च्या आसपास कर्मचारी आहेत. याशिवाय खाजगी कंत्राटदाराचे २५०० च्या आसपास कर्मचारी पालिकेत कार्यरत आहे. मागील काही दिवसापासून पालिका कर्मचाºयांना सानुग्रह अनुदानाची प्रतिक्षा होती. तो केव्हा आणि किती मिळणार हे निश्चित चित्र नव्हते. त्यात पालिकेची आर्थिक स्थिती ही नाजुक असल्याने याचा निर्णय महापालिकेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात टोलवला होता. दुसरीकडे महापालिकेतील कामगार युनियनने कर्मचाºयांना २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. त्यात कल्याण महापालिका कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान लागू झाल्यानंतरही ठाणे महापालिका कर्मचाºयांना तो केव्हा लागू होणार असा सवाल केला जात होता. अखेर सोमवारी यावर शिक्कामोर्तब होत महापालिका कर्मचाºयांची दिवाळी गोड झाली आहे. पालिका कर्मचाºयांना २१ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजुर झाले आहे. मागील वर्षी पालिका कर्मचाºयांना १८ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळाले होते. यंदा त्यात अडीच हजारांची वाढ झाली आहे. यामुळे आता पालिकेच्या तिजोरीवर साधारणपणे २० कोटींच्या आसपास बोजा पडणार आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाºयांना या सानुग्रह अनुदानाचे वाटप केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
आशा सेविकांना दिवाळी भाऊबीज भेटमध्ये २० टक्के वाढ
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या आशा सेविकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळी भाऊबीज भेट मध्ये २० टक्के अशी भरघोस वाढ करुन त्यांना रुपये ६ हजार इतकी रक्कम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहिर करण्यात आली असल्याचेही माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले आहे.