जिल्ह्यातील गावपाड्यांमध्ये वर्षभरात २१ हजार ५३४ कोरोनामुक्त; ६४३ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:41 AM2021-04-24T04:41:17+5:302021-04-24T04:41:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील शहरांमध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात कहर केला आहे. त्या तुलनेत ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील शहरांमध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात कहर केला आहे. त्या तुलनेत ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण, आदिवासी भागात या रुग्णांचे प्रमाण तसे फारसे नाही. परंतु, शहरी भागाला म्हणजे महापालिका शहरांजवळील गावपाड्यांमध्ये रुग्णसंख्या दिसून येत आहे. जिल्ह्यातील या गावपाड्यांमध्ये वर्षभरात २३ हजार ९८५ कोरोनाबाधित सापडले. मात्र, यापैकी २१ हजार ५३४ जण कोरोनामुक्त झाले असून ६४३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी एक हजार ८०८ जणांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नियंत्रणातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर (पीएचसी) ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील एक हजार ८०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या पीएचसींमध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा नाही. त्यामुळे या गावपाड्यांतील ठिकठिकाणचे ९५ रुग्ण जवळील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये व शहरांतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनवर आहेत तर आठ जण जीवन-मरणाचे ठोके व्हेंटिलेटरवर मोजत आहेत. या ग्रामीण रुग्णांसाठी वरदान ठरणारे भिवंडी तालुक्यातील सवाद, भिणार व वज्रेश्वरी येथील कोरोना रुग्णालये मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेअभावी तसेच ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे केवळ निरोपयोगी ठरत आहे. गुरुवारी पालकमंत्र्यांनी या रुग्णालयांवरील मनुष्यबळासह सोयीसुविधांवर तीन तास चर्चा केली. मात्र, तत्काळ ठोस उपाययोजना म्हणून लोकप्रतिनिधींचा निधी व ऑक्सिजन प्लान्ट उभारणीवर भर देण्याचे नियोजन केले आहे.
-१२२९ ग्रामस्थ होम क्वॉरंटाइन
जिल्ह्यातील या ग्रामीण, दुर्गम भागातील एक हजार १२९ ग्रामस्थांनी स्वत:ला घरात क्वारंटाइन करून घेत उपचार सुरू केले आहेत. यापैकी शहापूर तालुक्यातील २०९ ग्रामस्थांवर घरात उपचार सुरू आहेत. या तालुक्यातील शेंद्रुण, वासिंद, अघई, टाकीपठार, खानिवली, शेणवा, टेंभा आणि डोळखांब पीएचसीच्या आरोग्य यंत्रणेकडून उपचार सुरू आहेत. या आरोग्ययंत्रणेकडून आतापर्यंत चार हजार २३७ रुग्णांवर उपचार झाले. यापैकी तीन हजार ६२८ जण कोरोनामुक्त झाले. उर्वरित ४७१ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातील ५१५ रुग्णांवर उपचार सुरू असून ४९५ घरी क्वाॅरंटाइन होऊन उपचार घेत आहेत. यावर म्हसा, ढसाळ, नारीवली, किशोर, सरळगाव, शिरोशी, मोरोशी आणि तुळई पीएचसीची यंत्रणा लक्ष ठेवून आहे.
------