एकट्या प्रभाग क्रं-१७ मध्ये २२ कोटीचे विकास कामे; उल्हासनगरातील मूलभूत कामासाठी २४ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:10 PM2020-12-25T17:10:47+5:302020-12-25T17:12:08+5:30
महापालिका आर्थिक डबघाईला आल्याचे प्रभागातील विकास कामाच्या निधीला मर्यादा येणार हे ओळखून प्रभागाचे नगरसेवक व राष्ट्रवादीचे गटनेते यांनी राज्य शासनाकडे प्रभागातील विकास कामासाठी पाठपुरावा केला.
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील मूलभूत सुख सोई सुविधांच्या विविध कामासाठी शासनाने २४ कोटी ३७ लाखाच्या निधीला मंजूरी देण्यात आली. एकट्या प्रभाग क्रं-१७ मधील विविध विकास कामासाठी तब्बल २२ कोटींचा निधी देण्यात आला असून राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते व सभागृहनेते भरत गंगोत्री यांना निधी आणण्या बाबत श्रेय जाते.
उल्हासनगरात राष्ट्रवादी पक्षाला जीवदान देणाऱ्या भरत गंगोत्री यांनी पक्षाचे प्रभाग क्रं-१७ मधून स्वतःसह ४ नगरसेवक निवडून आणले. महापालिकेत ते स्वतः पक्षाचे गटनेता असून दोन महिन्या पूर्वी शिवसेना आघाडीने त्यांची सभागृहनेते पदी निवड केली. प्रभाग क्रं-१७ मधील विविध विकास कामा बाबत त्यांनी राज्य शासना सोबत पाठपुरावा केल्यावर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास कामा बाबत आश्वासन देऊन प्रभागासह इतर कामाची यादी महापालिका द्वारे पाठविण्यास सांगितली होती. प्रभाग क्रं-१७ मधील विविध २२ कोटींचा कामासह शेजारील प्रभाग क्रं-१६ व १७ मधील विकास कामे असे एकूण २४ कोटी ३७ लाख,६४ हजार रुपये किंमतीच्या कामांना २१ डिसेंबर रोजी मंजुरी मिळाली. नवीन वर्षात सर्वच कामाचे भूमिपूजन होणार असल्याची प्रतिक्रिया भरत गंगोत्री यांनी दिली.
ऐन नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला २४ कोटी ३७ लाखाच्या विविध विकास कामाला मंजूरी मिळाल्याने, शहरात आनंद व्यक्त होत आहे. प्रभाग क्रं-१७ मधील नेताजी गार्डन, पुष्पवन उद्यान, सरोजिनी नायडू उद्यान व भारत उद्यानाचे नुतनीकरण होणार असून प्रत्येक उदयान्याला प्रत्येकी १ कोटीचा निधी मंजूर आहे. तसेच भाटिया चौक ते गणेशनगर दरम्यानचा सिमेंट रस्त्यासाठी ४ कोटी, नेताजी चौक, प्रभाग समिती कार्यालय परिसरातील रस्त्याचे काँक्रेटिकरण साठी ३ कोटी ३६ लाख, स्मशानभूमी परिसरातील सिमेंट रस्त्यांसाठी ८ कोटी असे एकूण २२ कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आली. तर प्रभाग क्रं-१६ व १८ मधील विकास कामासाठी २ कोटीचा निधी देण्यात आला. नवीन वर्षात सर्वच विकास कामाला सुरुवात होणार असून भूमीपूजनाला उपमुख्यमंत्री अजित पवार येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शहर विकासासाठी गंगोत्रीचा आदर्श घ्यावा
महापालिका आर्थिक डबघाईला आल्याचे प्रभागातील विकास कामाच्या निधीला मर्यादा येणार हे ओळखून प्रभागाचे नगरसेवक व राष्ट्रवादीचे गटनेते यांनी राज्य शासनाकडे प्रभागातील विकास कामासाठी पाठपुरावा केला. अखेर त्यांना यश येऊन एकट्या प्रभाग क्रं-१७ मधील विविध विकास कामासाठी २२ कोटी पेक्षा जास्त निधीला शासनाने मंजूर केला. तसे पत्र शासनाने २१ डिसेंबरला काढले. प्रभागातील विकास कामे करण्यासाठी इतर नगरसेवकांनी भरत गंगोत्री यांचा आदर्श घ्यावा. असे आता गंमतीने बोलले जात आहे.