उल्हासनगरात २२ किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 06:16 AM2018-05-10T06:16:22+5:302018-05-10T06:16:22+5:30
शहर गुन्हे अन्वेषण विभागाने २२ किलो गांजासह एकाला अटक केली आहे. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून चार महिन्यापूर्वी खंडवा जेलमधून बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उल्हासनगर - शहर गुन्हे अन्वेषण विभागाने २२ किलो गांजासह एकाला अटक केली आहे. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून चार महिन्यापूर्वी खंडवा जेलमधून बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच दोन मोबाइल चोरटयांना अटक करून त्यांच्याकडून एक दुचाकीसह आठ मोबाइल जप्त केले.
कॅम्प नं-४ सुभाषटेकडी परिसरात एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शहर गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी मंगळवारी गुरूद्बार परिसरात सापळा लावला. दोन बॅग घेऊन आलेल्या एका संशयित व्यक्तीची झाडाझडती घेतली असता बॅगेमध्ये विविध पिशव्यात गांजा लपवला होता.
२१ किलो ६०५ ग्रॅम वजनाच्या गांजाची किंमत ३ लाख २४ हजार असल्याचे तरडे यांनी पत्रकारांना सांगितले. गणेश बालन शेट्टी (५०) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर महात्मा फुले, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, नेरळ , कर्जत, मध्य प्रदेश आदी ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गणेश जेलमधून सुटल्यावर गांजा विक्री करायला लागला होता. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.