महासभेच्या जेवणावळीवर २२ लाखांची उधळपट्टी
By Admin | Published: September 1, 2015 04:32 AM2015-09-01T04:32:51+5:302015-09-01T04:32:51+5:30
विषयाला अनुसरून चर्चा करण्याऐवजी ती भलत्याच विषयांवर करून महासभा एकदा चालविण्याऐवजी ती पाच ते सात वेळा घेण्यास भाग पाडून केवळ जेवणावळी वरती लाखोंची
ठाणे : विषयाला अनुसरून चर्चा करण्याऐवजी ती भलत्याच विषयांवर करून महासभा एकदा चालविण्याऐवजी ती पाच ते सात वेळा घेण्यास भाग पाडून केवळ जेवणावळी वरती लाखोंची उधळपट्टी करण्याचा अनोखा विक्रम ठाणे महापालिकेतील राजकीय भोजनभाऊनी केला आहे.
मागील पाच महिन्यांत किमान पाच महासभा होणे अपेक्षित असताना त्या तब्बल ३६ झाल्या असून त्यासाठीच्या जेवणावळीवर सुमारे २२ लाखांहून अधिकची उधळपट्टी झाली आहे. या खर्चाबाबत शहरवासीयांत संताप व्यक्त होत आहे. २०१२ नंतर ठाणे महापालिकेची आर्थिक तसेच राजकीय घडी पुरती विस्कटलेली आहे. त्यात प्रत्येक महिन्यात होणाऱ्या महासभेच्या निमित्ताने कधी प्रशासनावर तर सत्ताधाऱ्यांविरोधात किंबहुना कधी संगनमताने एकच महासभा महिनाभर चालविण्याचा प्रताप ठाण्यातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे. काही वेळेस सचिवांची कॉलर पकडणे, त्यांच्यावर पाणी टाकणे, उद्धटपणे बोलणे आणि विषयाला सोडून इतर मुद्यांवर चर्चा करून सत्ताधारी आणि विरोधक अनेक वेळा महासभेचा वेळ वाया घालवतांना दिसले आहेत. याची नाराजी महिला सदस्यांनी अनेक वेळा सभागृहात बोलून दाखविली. परंतु, एकच महासभा अनेक वेळा चालविण्याचा कित्ताच या राजकीय पुढाऱ्यांनी गिरवणे सुरूच ठेवले आहे.
प्रत्येक महिन्याला एक महासभा घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार, एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत पाच महासभा होणे अपेक्षित होते. परंतु, या कालावधीत तब्बल ३६ महासभा झाल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. प्रत्येक महासभेला साधारणपणे सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आणि सायंकाळी चहा असे ठरलेले आहे.