ठाण्यात २२ टक्के पाणी कपात; आठवड्यातून एक दिवस पाणी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 12:51 AM2018-10-12T00:51:26+5:302018-10-12T00:52:22+5:30
मुंब्रा - कळवा यांसारख्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून आठवड्यात २२ टक्के पाणी कपात होणार आहे.
ठाणे : मुंब्रा - कळवा यांसारख्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून आठवड्यात २२ टक्के पाणी कपात होणार आहे. यासाठी २१ आॅक्टोबरपासून आठवड्यातून एक पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
लघुपाटबंधारे विभागाने गुरुवारी पाण्याच्या स्थितीबाबत बैठक घेऊन आठवड्यात २२ टक्के पाणी कपातीचे फर्मान जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, एमआयडीसी आणि टेमघर या पाणी उचलणाºया संस्थांना काढले. १५ जुलैपर्यंत पाणी पुरवण्याची गरज लक्षात घेऊन २२ टक्के पाणी कपातीचा निर्णय लागू करण्यात आला.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल एक महिना आधी पाणी कपात लागू करावी लागली. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून १४ टक्के कपात लागू केली होती. फेब्रुवारी, मार्चला ती ७ टक्के केली. त्यानंतर तीही रद्द केली होती; पण आता धरणातील कमी साठा लक्षात घेऊन लघुपाटबंधारे विभागाने कपात लवकर सुरू केली. बैठकीतील निर्णयानुसार एमआयडीसी शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार आहे. महापालिका त्यांच्या सोयीच्या दिवशी कपात लागू करण्याचा निर्णय घेणार आहे.
सणांच्या काळात पाणी कपात टाळण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मुंब्रा - कळवा यांसारख्या काही भागांसह जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि एमआयडीसींना पाणीपुरवठा करणाºया आंध्रात सुमारे ३२४ दशलक्ष घनमीटर तर बारवीत २२४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यास अनुसरून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. कुणीही जादा पाणी उचणार नाही, याची दक्षता घेण्याची तंबीदेखील या बैठकीत लघुपाटबंधारे विभागाने दिली.