टीएमटीच्या २२३ बसचे आयुर्मान संपले; नव्या २०० बस घ्या, परिवहन सभापतींचे महापौरांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 12:16 AM2020-12-05T00:16:06+5:302020-12-05T00:16:20+5:30
सध्या असलेल्या बस दुरुस्तीसाठीदेखील परिवहनकडे निधी नाही. यापूर्वीदेखील नव्याकोऱ्या बससुद्धा किरकोळ किंवा मोठ्या दुरुस्तीसाठी धूळखात पडून असल्याने त्यांचे आयुर्मान संपले आहे.
ठाणे : टीएमटीच्या बस रस्त्यावर धावण्यापेक्षा दुरुस्तीसाठीच अधिक काळ धूळखात पडल्याने तब्बल २२३ बसचे १० वर्षांचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. त्यामुळे त्यांची दुरुस्ती न करता भंगारात काढून त्याऐवजी नव्या २०० बस घेण्याची मागणी ठाणे परिवहन समितीने महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे गुरुवारी केली.
परिवहनच्या ताफ्यात ५१७ बस असल्याचा दावा परिवहन सभापती विलास जोशी यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात केला आहे. मार्च २०२० पूर्वी ठाणेकरांच्या सेवेत २९० बस रस्त्यावर धावत होत्या. परंतु, लॉकडाऊनमुळे आणि प्रवाशांची संख्या घटल्याने सध्या २१० बस रस्त्यावर धावत आहेत. त्यातही खाजगी ठेकेदाराच्या बसचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. यापूर्वी जेएनएनयूआरएमअंतर्गत घेतलेल्या २२३ बसचे आयुर्मान आता १० वर्षांचे झाले आहे. त्यामुळे त्या दुरुस्त करण्याऐवजी थेट भंगारात काढाव्यात, असे महापाैरांनी म्हटले आहे. त्यातही केंद्र शासनाच्या निर्देशानुसार वाहने बीएसव्ही-आय मानांंकनाची खरेदी करणे बंधनकारक आहे. या बसचे सुटे भागही डीलरकडे मिळत नसल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. यामुळे दुरुस्तीवर खर्च करण्यापेक्षा नव्या २०० बस घ्याव्यात. सध्या एमएमआरडीएकडे परिवहनने १०० इलेक्ट्रिक बसची मागणी केली आहे. त्यात आणखी १०० बस घेऊन २०० बस ठाणेकरांना उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांचे मत आहे.
दुरुस्तीचा खर्च कसा करणार?
सध्या असलेल्या बस दुरुस्तीसाठीदेखील परिवहनकडे निधी नाही. यापूर्वीदेखील नव्याकोऱ्या बससुद्धा किरकोळ किंवा मोठ्या दुरुस्तीसाठी धूळखात पडून असल्याने त्यांचे आयुर्मान संपले आहे. असे असताना आता २०० बस मिळाव्यात, यासाठी आग्रह धरला जात आहे. परंतु, त्या घेण्याचा खर्च कोण करणार, एमएमआरडीएने त्या घेऊन दिल्या, तरी त्याचा परतावा परिवहन कसा करणार. त्यातही त्या सेवेत आल्यानंतर बिघडल्या तर त्यांची दुरुस्ती कोण करणार, त्यासाठी परिवहनकडे निधी आहे का, असे अनेक सवाल आता यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.