ठाणे जिल्ह्यातील २२५७८ असाक्षरांचा लेखी परीक्षेला उत्तम प्रतिसाद
By सुरेश लोखंडे | Published: March 17, 2024 05:14 PM2024-03-17T17:14:57+5:302024-03-17T17:15:11+5:30
शिक्षण खात्याच्या योजना विभागाकडून उल्लास- नवभारत साक्षरता हे अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. १
ठाणे : केंद्र पुरस्कृत उल्लास- नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी ठाणे जिल्ह्यातील असाक्षरांची पायाभुत साक्षरता आणि मुल्यमापन चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील २२ हजार ५७८ असाक्षरांनी ही परीक्षा दिली. स्त्री व पुरूषांचा सहभाग असलेल्या या परीक्षार्थीनी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या एक हजार ६२८ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा दिली आहे. या परीक्षेला जिल्ह्याभरात उत्तम प्रतिसाद मिळाला असे शिक्षणाधिकारी (याेजना) भावना राजनाेर यांनी लाेकमतला सांगितले.
जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर पार पडलेली ही परीक्षा वाचन, लेखन आणि संख्याज्ञान अशा तीन भागां घेण्यात आली. त्येकी ५० या प्रमाणे १५० गुणांची ही ऑफलाईन परीक्षा हाेती. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागात किमान ३३ गुण आवश्यक आहेत,या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकत्रित हाेत्या. प्रत्यक्ष पेपरला तीन तासांचा कालावधी देण्यात आला. दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जास्त वेळ दिला आहे. जिल्ह्यातील असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करुन त्यांचे साक्षरतेचे वर्ग घेतल्यानंतर आज त्यांची ही लेखी परीक्षा जिल्ह्यात घेण्यात आली.
शिक्षण खात्याच्या योजना विभागाकडून उल्लास- नवभारत साक्षरता हे अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. १५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या असाक्षरांना साक्षर बनवण्यासाठी हा उपक्रम आहे. यामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, जीवन कौशल्ये विकसित करणे हे मुख्य उद्दीष्ठ या अभियानाचे आहे, त्यात लेखन, वाचन, संख्याज्ञानासह आर्थिक साक्षरता, कायदा आणि डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्यनिहाय बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण अशा घटकांचा समावेश आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, गटस्तरीय, केंद्रस्तरीय, शाळास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून ही परीक्षा आज घेण्यात आली.