२२७ हरवलेली बालके स्वगृही परतली
By Admin | Published: August 2, 2015 01:55 AM2015-08-02T01:55:40+5:302015-08-02T01:55:40+5:30
हरवलेल्या बालकांच्या शोधमोहिमेसाठी राज्यात राबविलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’अंतर्गत ठाणे शहर पोलिसांमुळे ३१ दिवसांत २२३ बालकांची त्यांच्या पालकांशी पुनर्भेट क रून दिली.
ठाणे : हरवलेल्या बालकांच्या शोधमोहिमेसाठी राज्यात राबविलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’अंतर्गत ठाणे शहर पोलिसांमुळे ३१ दिवसांत २२३ बालकांची त्यांच्या पालकांशी पुनर्भेट क रून दिली. यामध्ये हरवलेल्या दोन विशेष बालकांसह कोणतीही तक्रार दाखल नसलेल्या ४१ बालकांचा त्याचबरोबर बालसुधारगृहांत जीवन जगणाऱ्या ५८ बालकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हरवलेल्या ६९ मुली घरी पाठविल्याची माहिती चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने दिली.
भारत सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यात १ ते ३१ जुलैदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत चार पथके तयार केली होती. या पथकांद्वारे ठाणे शहरासह जिल्ह्यातील हरवलेल्या मुलांची तपासणी केली. विशेष म्हणजे बालसुधारगृहांतील बालकांना स्वगृही पाठविण्यावर विशेष भर दिला होता. या विशेष मोहिमेंतर्गत २२७ बालके पोलिसांना सापडली. त्यातील २२३ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे, तर बेवारस सापडलेल्या ४ मुलांना सुधारगृहात दाखल केले. (प्रतिनिधी)
पालकांच्या ताब्यात देण्यात आलेली मुले/मुली
माहिती मिळालेले : ८ (मुले ४, मुली ४), अपहरण : ३५ (मुले १३, मुली २२), बेवारस : ४१ (मुले ३४, मुली ७), बालकामगार : ३५ (मुले ३३, मुली २), भिक्षेकरी : ४४ (मुले २१, मुली २३)
सुधारगृहातून पालकांच्या ताब्यात : एकूण ५८ (मुले ४७, मुली ११)
बेवारस मुले सुधारगृहात दाखल : एकूण ४ (मुले ४)
विशेष बालक : एकूण २ (मुले २)
मुलीसाठी पालक झाले भिकारी...
१काकासोबत मुंबई पाहण्यासाठी मध्य प्रदेशमधून जुलैच्या पहिल्या आठवड्यात आलेली लक्ष्मी धानक ही १२वर्षीय मुलगी त्यांच्या झालेल्या चुकामुकीमुळे हरवली होती. याबाबत, तिच्या काकांनी पोलीस ठाण्यात तक्रार न करता तिच्या शेतकरी आईवडिलांना सांगितले.
२मुलीचा शोध घेता-घेता आणलेले पैसे संपले, पण मुलीला घरी घेऊन जाणारच, असा निश्चय केल्याने मुंबईत भीक मागून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. याचदरम्यान, ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट डोंगरी बालसुधारगृहात जात असताना भायखळा रेल्वे स्थानकात हे धानक दाम्पत्य रडत भीक मागताना दिसून आले.
३त्यांची चौकशी केली असता मुलगी हरवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांनाही त्या बालसुधारगृहात नेले. तेथे लक्ष्मी मिळून आली. विशेष म्हणजे हे दाम्पत्य येताना मुलीचे सर्व पेपर आणि फोटो घेऊन आल्याने त्यांची पुनर्भेट झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पालकांच्या ताब्यात देण्यात आलेली मुले/मुली
माहिती मिळालेले : ८ (मुले ४, मुली ४), अपहरण : ३५ (मुले १३, मुली २२), बेवारस : ४१ (मुले ३४, मुली ७), बालकामगार : ३५ (मुले ३३, मुली २), भिक्षेकरी : ४४ (मुले २१, मुली २३)
सुधारगृहातून पालकांच्या ताब्यात : एकूण ५८ (मुले ४७, मुली ११)
बेवारस मुले सुधारगृहात दाखल : एकूण ४ (मुले ४)
विशेष बालक : एकूण २ (मुले २)