२,२९४ कारखाने उठले लोकांच्या जीवावर; जिल्ह्यातील जल, वायू प्रदूषणाच्या संकटांना कारणीभूत

By सुरेश लोखंडे | Published: May 27, 2024 09:06 AM2024-05-27T09:06:11+5:302024-05-27T09:07:01+5:30

कडक कारवाईचा बडगा उगारण्याची गरज लाेकप्रतिनिधींनीही व्यक्त केली आहे

2,294 factories came up claiming lives, causing water and air pollution woes in the thane district | २,२९४ कारखाने उठले लोकांच्या जीवावर; जिल्ह्यातील जल, वायू प्रदूषणाच्या संकटांना कारणीभूत

२,२९४ कारखाने उठले लोकांच्या जीवावर; जिल्ह्यातील जल, वायू प्रदूषणाच्या संकटांना कारणीभूत

सुरेश लाेखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: डाेंबिवलीतील स्फोटाच्या घटनेसह या आधीही विविध जीव घेणाऱ्या घटना जिल्ह्यातील औद्याेगिक क्षेत्रात घडल्या आहेत. त्यास आळा घालण्यासाठी तात्पुरत्या उपाययाेजना हाती घेतल्या जात असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात आजही जल, वायू प्रदूषणाला कारणीभूत दाेन हजार २९४ रेड झाेनमधील कारखाने जीवावर उठले आहेत. यामध्ये ठाणे शहर व तालुक्यातील सर्वाधिक एक हजार ९७ कारखान्यांचा समावेश असल्याचे वास्तव प्रशासनाच्या अहवालावरून उघड झाले आहे. या कारखान्यांचा प्रदूषण निर्देशांक ६० पेक्षा अधिक असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यावर कडक कारवाईचा बडगा उगारण्याची गरज लाेकप्रतिनिधींनीही व्यक्त केली आहे. 

जिल्ह्यातील ठीकठिकाणच्या एमआयडीसी क्षेत्रांत आठ हजार ७८० मोठे कारखाने आहेत. त्यातील रासायनिक कारखान्यांकडून व अन्य कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे जल व वायू प्रदूषणाला वेळीच आळा घालण्याची गरज आहे. यासाठी वेळोवेळी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या. नदी, नाले, खाडीत सोडण्यात येणाऱ्या रसायनांमुळे एमआयडीसी क्षेत्रात रात्रीच्यावेळी टँकर वाहतुकीला मनाई केली आहे. मात्र, विविध उपाययोजना करूनही फारसा बदल झालेला नाही. भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाणे खाडीतील प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाला धारेवर धरले होते; पण वरदहस्त लाभलेल्या या कारखान्यांच्या व्यवस्थापनाच्या मनमानीमुळे जिल्ह्यातील जनजीवन संकटात आहे.

गेल्या वर्षभरात प्रशासनाने पाहणी करून झोननिहाय कारखान्यांची नोंद केली. यात धोकादायक असलेल्या रेड झोनसह नारिंगी, हिरवा, पांढऱ्या झोनमधील तब्बल आठ हजार ७८० कारखान्यांची नोंद आहे. त्यात अतिधोकादायक म्हणजे ६० पेक्षा अधिक प्रदूषण निर्देशांक असलेल्या दाेन हजार २९४ कारखान्यांचा रेड झोनमध्ये समावेश आहे. या रेड झोनमध्ये ठाणे तालुका व शहराच्या परिसरात जिल्ह्यात सर्वाधिक एक हजार ९७  कारखान्यांची नोंद आहे. 

झाेननिहाय कारखान्यांचा प्रदूषण निर्देशांक

  • रेड झोन - प्रदूषण निर्देशांक ६० पेक्षा अधिक असलेले कारखाने
  • ऑरेंज झोन - ४१ ते ५९ प्रदूषण निर्देशांक
  • ग्रीन झोन -  २१ ते ४० प्रदूषण निर्देशांक
  • व्हाइट झोन - प्रदूषण निर्देशांक २० पर्यंत असलेले कारखाने


तालुकानिहाय जीवघेण्या रेड झाेन कारखान्यांची संख्या

  • ठाणे     १,०९७
  • भिवंडी     ४३३
  • शहापूर     ३२ 
  • कल्याण     ३०९ 
  • उल्हासनगर     १५ 
  • अंबरनाथ     ३६० 
  • मुरबाड     ४८

Web Title: 2,294 factories came up claiming lives, causing water and air pollution woes in the thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.