फुकट्यांकडून २३ लाखांचा दंड वसूल, मध्य रेल्वेच्या २६ तिकीट तपासनिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 02:22 AM2019-08-17T02:22:28+5:302019-08-17T02:23:54+5:30
Mumbai Local Updates: विनातिकीट प्रवास करणे, हा कायद्याने गुन्हा असतानाही लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नसल्याचे दिसत आहे.
- पंकज रोडेकर
ठाणे : विनातिकीट प्रवास करणे, हा कायद्याने गुन्हा असतानाही लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नसल्याचे दिसत आहे. मागील सात महिन्यांत ठाणे रेल्वेस्थानकात विनातिकीट रेल्वे प्रवास करणा-या आठ हजार ८०२ जणांना रेल्वे तिकीट तपासनिसांनी पकडून तब्बल २२ लाख ८५ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ऐतिहासिक असलेल्या ठाणे रेल्वेस्थानकात १० फलाट असून आतबाहेर करण्यासाठी एकूण २७ गेट आहेत. त्याचबरोबर मध्य रेल्वे, ट्रान्स-हार्बर आणि एक्स्प्रेस व मालगाडी अशा वाहतुकीद्वारे या स्थानकातून दररोज सात ते आठ लाख प्रवासी येजा करतात. स्थानकात तिकीट तपासणीसाठी २६ जण आहेत.
१ जानेवारीपासून ३१ जुलै २०१९ दरम्यान त्यांनी आठ हजार ८०२ फुटक्या प्रवाशांना पकडले आहे. यामध्ये प्रथम श्रेणीत ५७१, तर द्वितीय श्रेणीत आठ हजार २३१ जणांना पकडले आहे. त्यांच्याकडून २२ लाख ८४ हजार ९२० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
ठाण्यात तीन बोगस टीसी
ठाणे रेल्वेस्थानकात एकूण २६ टीसी असताना मोठ्या धाडसाने ठाण्यात एक्स्प्रेसमध्ये बोगसरीत्या तिकिटांची तपासणी करणा-या दोघांना अटक केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी रेल्वेस्थानकावर एका महिलेला तिकीट तपासणी करताना पकडले आहे. अशा प्रकारे या तिघांना या वर्षात पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली.