मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने २३ लाखांची फसवणूक
By नितीन पंडित | Published: January 27, 2024 04:39 PM2024-01-27T16:39:07+5:302024-01-27T16:39:36+5:30
भिवंडीत दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल...
भिवंडी: मुंबई येथील सुप्रसिध्द मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगून शिक्षिका असलेल्या पालकांकडून २३ लाख घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी भिवंडीत दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सौदागर मोहल्ला या परिसरात राहणाऱ्या शिक्षिका असलेल्या अफरोज अन्वर कुरेशी (भाबे) वय ५० वर्षे यांच्या मुलीला मुंबई येथील सोमय्या कॉलेज, विद्याविहार येथे प्रवेश घ्यावयाचा असल्याने त्या दरम्यान त्यांची ओळख प्रेरणा बनवारीलाल शर्मा वय २२ वर्षे, रा.ओसवालवाडी व कबीर सरकार यांच्याशी ओळख झाली.त्यातून विश्वास संपादन करून मुलीला महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून एम.बी.बी.एस ला ऍडमिशन करून देते असे सांगुन ३० ऑगस्ट २०२१ ते १० नोव्हेंबर २०२२ या दरम्यान दोघांनी संगनमत करून महिलेस वेळोवेळी बनावट कागदपत्रे देवुन त्यांच्या कडून रोख व बँक खात्यावर एकुण ३३ लाख रुपये उकळले.
परंतु प्रवेश न मिळाल्याने महिलेने पैसे परत मागितले असता त्यांना १० लाख रुपये परत केले. व शिल्लक २३ लाखांची मागणी केली असता दोघे ही मोबाईल बंद करून फरार झाले आहेत.त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने महिलेने नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी प्रेरणा बनवारीलाल शर्मा व कबीर सरकार या दोघां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली पाटील करत असू पोलीस या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.