२३ मराठी शाळा मान्यतेच्या प्रतिक्षेत
By admin | Published: October 5, 2016 02:25 AM2016-10-05T02:25:21+5:302016-10-05T02:25:21+5:30
मराठी शाळांना मान्यता देण्याबाबत शासकीय पातळीवर खूपच उदासीनता असून
बोईसर : मराठी शाळांना मान्यता देण्याबाबत शासकीय पातळीवर खूपच उदासीनता असून बृहत: आराखड्या अंतर्गत येणाऱ्या पालघर जिल्ह्यामधील तेवीस मराठी शाळा आजही मान्यतेच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी बोईसर येथे दिली.
पंचतत्व सेवा संस्था (बोईसर) व मराठी अभ्यास केंद्र (ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने व पालघर जिल्हा पत्रकार संघ यांच्या पुढाकाराने तारापूर एमआयडीसीमधील टीमा सभागृहात आयोजित केलेल्या मराठीकारणाचा एल्गार या कार्यक्रमात मराठी भाषेच्या चळवळी व गरजेबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील, पंचतत्व सेवा संस्थेचे जनरल सेक्रेटरी हिंदुराव सकपाळ, मराठी अभ्यास केंद्राचे पालघर जिल्ह्याचे समन्वयक सुशिल शेजुळे, मराठी अभ्यास केंद्राचे सदस्य आनंद भंडारे आदी उपस्थित होते.
डॉ. पवार यांनी मराठीच्या एकेका प्रश्नावर काम करून भागणार नाही. त्यासाठी अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढले पाहिजे, पालघर जिल्ह्यात मराठी भाषेची चळवळ ही जिल्ह्यातील माणसांनीच उभारली पाहिजे. असे सांगून महाराष्ट्रातील मराठी शाळांची संस्था झपाट्याने कमी होत असल्याचे सांगून नवश्रीमंतांचा वर्ग इंग्रजी भाषेच्या शाळा अर्थकारणाकरीता चालवितात असा दावा केला. शासनास परीभाषा व विश्वकोष ही वेळेवर काढता येत नसल्याची टीका करून अनुदानाकरीता आमच्या दारात कुणी येऊ नये ही भूमिका शासनाची असल्याचे सांगितले.