पंचम कलानींकडे २३ कोटी ७५ लाख
By admin | Published: February 18, 2017 05:03 AM2017-02-18T05:03:14+5:302017-02-18T05:03:14+5:30
महापालिका निवडणूक रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांचे शिक्षण बेताचे किंवा ‘अशिक्षित’ या श्रेणीचे आहे.
उल्हासनगर : महापालिका निवडणूक रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांचे शिक्षण बेताचे किंवा ‘अशिक्षित’ या श्रेणीचे आहे. मात्र, त्यांच्याकडील संपत्तीचे आकडे वाचले, तर डोळे पांढरे होतील. ओमी कलानी यांची पत्नी पंचम या सर्वात धनाढ्य उमेदवार असून त्यांच्याकडे २३ कोटी ७५ लाख रुपयांची माया आहे. मात्र, भाजपाच्या उमेदवार सिमरन वानखेडे यांनी आपल्याकडे शून्य संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रावर जाहीर केले.
पंचम यांच्यापाठोपाठ भाजपाचे विजय पाटील यांच्याकडे १८ कोटींची संपत्ती आहे. विद्यमान ४ नगरसेवकांसह १३ उमेदवारांनी आपण अशिक्षित असल्याचे जाहीर केले आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या ७८ जागांसाठी ४७९ उमेदवार रिंगणात आहेत. पाच वर्षांपूर्वी ज्यांची संपत्ती लाखांत होती, त्यांची संपत्ती या वेळी कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. ४७९ उमेदवारांपैकी ८० टक्के उमेदवार इयत्ता दहावीपेक्षा कमी शिकलेले आहेत. ज्या १३ उमेदवारांनी आपण अशिक्षित असल्याचे कबूल केले आहे, त्यामध्ये विद्यमान नगरसेवक विजय पाटील, जयश्री पाटील, ज्योती गायकवाड, लीला आशान यांचा समावेश आहे. प्रभाग क्र.-१५ व १९ मध्ये कोट्यधीश उमेदवार आमनसामने आहेत. प्रभाग क्र.-१५ मधील शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक वसुधा बोडारे, धनंजय बोडारे यांच्यासह शीतल बोडारे, भाजपाचे नरेंद्र राजानी, तर प्रभाग क्र.-१९ चे भाजपाचे उमेदवार व नगरसेवक विजय पाटील, मीनाक्षी पाटील, विघमान नगरसेविका मीना सोंडे व शिवसेनेचे विनोद ठाकूर कोट्यधीश आहेत. यांच्यातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांपैकी टोनी सिरवाणी, वंदना भदाणे, राजेंदसिंग भुल्लर, मीना कौर भुल्लर, धनंजय बोडारे, वसुधा बोडारे, राजश्री चौधरी, जया साधवानी, मोहन साधवानी, मीना आयलानी, डॉ. प्रकाश नाथानी, प्रदीप रामचंदानी, जीवन इदनानी, आशा इदनानी, राजकुमार जग्यासी, विनोद ठाकूर, विजय पाटील, मीना सोंडे, रमेश चव्हाण, भरत गंगोत्री, अंजली साळवे, राजेश वानखडे हे उमेदवार कोट्यधीश आहेत. भाजपाचे नगरसेवक राजेश वानखडे यांची मुलगी सिमरन प्रभाग क्र.-१७ मधून भाजपाच्या तिकिटावर रिंगणात उतरली असून तिने आपल्याकडे संपत्तीच नसल्याचे जाहीर केले आहे. प्रचार रॅली, इतर दररोजचा खर्च त्या कसा दाखवणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह निवडणूक अधिकाऱ्यांना पडला आहे. (प्रतिनिधी)
पंचम कलानी २३ कोटी ७५ लाख
विजय पाटील १८ कोटी
मीनाक्षी पाटील १२ कोटी
मीना आयलानी ९ कोटी
आशा इदनानी ८ कोटी ८३ लाख
भरत गंगोत्री ८ कोटी ५५ लाख
राजेंद्रसिंग भुल्लर ५ कोटी
राजा गेमनानी ४ कोटी ७१लाख
वंदना भदाणे ३ कोटी ७३ लाख
भारिपचे नाना रौराळे, ओमी टीमचे सुंदर मंगतानी, गणेश जगताप, भाजपाचे महेश सुखरामानी, साई पक्षाचे अॅड. प्रवीण कृष्णानी, त्रिलोकाणी, उमेश केदार, भाजपाचे सहात्ता सचदेव, सोनू छापू, शिवसेनेच्या शीतल कदम-बोडारे, ठाकूर चांदवाणी, अपक्ष सुरेश सोनावणे, कुलदीप सिंघानी हे कोट्यधीश उमेदवार आहेत.