एनडीआरएफच्या २३ जवानांची तुकडी ठाण्यात तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:39+5:302021-07-24T04:23:39+5:30

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात जलमय परिस्थिती उद्भवलेली असतानाच पुढील ...

23 NDRF personnel deployed in Thane | एनडीआरएफच्या २३ जवानांची तुकडी ठाण्यात तैनात

एनडीआरएफच्या २३ जवानांची तुकडी ठाण्यात तैनात

Next

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात जलमय परिस्थिती उद्भवलेली असतानाच पुढील काही दिवस पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यादरम्यान पूर परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्ती यांसारख्या घटना घडल्यास नागरिकांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनाला एनडीआरएफची जोड मिळणे गरजेचे आहे. ठाणे जिल्ह्यासाठी २३ जणांची एनडीआरएफची तुकडी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ठाण्यात तैनात झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत एनडीआरएफची तुकडी दुसऱ्यांदा ठाण्यात आली आहे.

जवळपास आठ दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाचे बरसणे सुरू असून, आणखी काही दिवस पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. ठाण्यात दरड कोसळणे, शहरी - ग्रामीण भागात जलमय परिस्थितीसारखी स्थिती निर्माण झाली होती. अशा घटनांमध्ये शेकडो नागरिक आणि जनावरे अडकून पडली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुसळधार पावसाने तानसा आणि मोडक सागर ही दोन धरणे ओव्हरफ्लो झाली असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. नदीनाले दुथडी भरून वाहत असल्याने ग्रामीण भागातील पूल पडले आहेत किंवा त्यांची परिस्थिती धोकादायक झाली. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास हाहाकार माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वेळी नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकून पडणाऱ्यांना सुखरूपरीत्या सुरक्षितस्थळी नेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जीवितहानीही टाळणे आवश्यक आहे. याची खबरदारी घेऊन शासनाने एनडीआरएफच्या २३ जवानांची एक तुकडी ठाण्यात धाडली आहे. ती पहाटेच्या सुमारास मुंबईतून आली असून, ठाणे महापालिकेच्या घोडबंदर रोडवरील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात त्यांची व्यवस्था केल्याची माहिती महापालिकेने दिली.

गेल्या वेळी तीन दिवसांत तुकडी परतली होती

मे महिन्यात निर्माण झालेल्या वादळ परिस्थितीच्या वेळी एनडीआरएफच्या तुकडीने ठाण्यात ठाण मांडले होते. त्या वेळी ती तीन दिवस ठाण्यात होती, त्यानंतर परतली होती.

Web Title: 23 NDRF personnel deployed in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.