ऑनलाईन शिक्षणाचा २३ हजार ५६ विद्यार्थ्यांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:44 AM2021-09-06T04:44:41+5:302021-09-06T04:44:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला सहा महिन्यांसाठी एक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला सहा महिन्यांसाठी एक हजार २०० रुपये प्रोत्साहनपर उपस्थिती भत्ता दिला जात आहे. मात्र, २५ हजार ७२८ पैकी १७ हजार ४३० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेतला आहे, तर फोनद्वारे व गृहभेटद्वारे पाच हजार ६२६ विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. परंतु, दोन हजार ६७२ विद्यार्थी हे संपर्कातच नसल्याने त्यांना यापैकी कोणत्याही योजनाचा लाभ देता आला नसल्याचे ठामपाच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून शाळा संपूर्णपणे बंद आहेत. मनपा शाळांमधील विद्यार्थी हे आर्थिक दुर्बल घटकातील असून, त्यांना ऑनलाइन शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, याकरिता सहा महिने एक हजार २०० रुपये प्रोत्साहनपर उपस्थिती भत्ता हा त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. परंतु, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने महिन्यातील २० दिवस उपस्थित राहणे अनिवार्य आहे. जर, एखादा विद्यार्थी २० दिवसांमधील काही दिवस अनुपस्थित राहिला तर पुढील महिन्यात त्या विद्यार्थ्याचा भत्ता दिला जाणार नाही. या कामासाठी एका शिक्षकावर २० विद्यार्थ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ २५ हजार ७२८ पैकी २३ हजार ५६ विद्यार्थ्यांनी सध्या घेतला आहे. यामध्ये आठ हजार २६८ मुले, तर नऊ हजार १६२ मुली आहेत. तर, फोनद्वारे आणि गृहभेटीद्वारे दोन हजार ८०५ मुले आणि दोन हजार ८२१ मुली शिक्षण घेत आहेत. तर, संपर्कात नसलेल्यांमध्ये एक हजार ४२० मुले आणि एक हजार २५२ मुली आहेत.
---------
ठामपा शाळेतील विद्यार्थ्यांनाही योग्य प्रकारे शिक्षण घेता यावे, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.
- मनीष जोशी, उपायुक्त, शिक्षण विभाग, ठामपा
-----------------