ठाण्यात २३ हजार लिटर पेट्रोल-डिझेलच्या टँकरला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली
By जितेंद्र कालेकर | Published: October 14, 2024 08:08 PM2024-10-14T20:08:36+5:302024-10-14T20:09:13+5:30
चालकाने प्रसंगावधान राखत अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने मिळविले आगीवर नियंत्रण.
जितेंद्र कालेकर (ठाणे), लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोडबंदर रोडमार्गे ठाण्याहून वसईकडे निघालेल्या तब्बल २३ हजार लिटर पेट्रोल आणि डिझेल भरलेल्या टँकरच्या टाकीवरील पेट्रोल भरण्याच्या होझ पाइपला सोमवारी दुपारी ३:४५ वाजता किरकोळ आग लागली. गायमुख जकात नाक्याजवळ घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन टँकरचालक मनोज यादव यांनी अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
वसईकडे जाणाऱ्या टँकरमध्ये प्रत्येकी पाच हजार लिटरचे पेट्रोल आणि डिझेलचे पाच कंपार्टमेंट होते. तब्बल २५ हजार लिटर क्षमतेच्या या टँकरमध्ये सुमारे २३ हजार लिटर डिझेल आणि पेट्रोल होते. यातील एका कंपार्टमेंटच्या झाकणाच्या तोंडावरील होझ पाइपला अचानक आग लागली. आग लागल्याचे निदर्शनास येताच टँकरचालक मनोज यादव यांनी प्रसंगावधान राखून घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचण्यापूर्वीच फायर एक्सटिंग्युशरच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणली. आग न भडकल्याने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर हा टँकर पुढे वसईला रवाना झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, ते पोहोचण्यापूर्वीच आग नियंत्रणात आणण्यात टँकर चालकाला यश आले.