२३० विहिरींना नव‘जीवन’
By admin | Published: May 10, 2016 02:02 AM2016-05-10T02:02:22+5:302016-05-10T02:02:22+5:30
सध्याची भीषण पाणीटंचाई पाहता ठाणे महापालिकेने नैसर्गिक स्रोत पुनरुज्जीवित करण्याचे काम हाती घेतले आहे. यात २३० विहिरींना नवजीवन मिळणार असून १५० बोअरवेल नव्याने खोदल्या जाणार आहेत
ठाणे : सध्याची भीषण पाणीटंचाई पाहता ठाणे महापालिकेने नैसर्गिक स्रोत पुनरुज्जीवित करण्याचे काम हाती घेतले आहे. यात २३० विहिरींना नवजीवन मिळणार असून १५० बोअरवेल नव्याने खोदल्या जाणार आहेत. यातील ७० टक्के विहिरींच्या स्वच्छतेचे काम पूर्ण झाले असून उरलेले १५ मे पर्यंत पूर्ण होईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
ठाण्यातील पाणीकपातीमुळे सर्वत्र तीव्र टंचाई आहे. भविष्यात पुन्हा टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेने वापरात नसलेल्या विहिरी पुन्हा वापरात याव्या, यासाठी त्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. साफसफाईसोबतच गाळ काढण्याचे काम हाती घेतले. ठाण्यात ५५५ विहिरी आहेत. त्यातील २३० वापरात नाहीत. त्यांचीच स्वच्छता हाती घेतली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता माधव जांगडे यांनी दिली.
यंदा पालिकेने १६० बोअरवेल नव्याने खोदल्या आहेत. त्यांचे काम आॅक्टोबरपासून सुरू झाले. यातील १३० बोअरवेलना पाणी लागले, तर ३० कोरड्या निघाल्या. सध्या ठाण्यात १,३७० बोअरवेल आहेत. त्यातील ७८६ बोअरवेलना हातपंप लावले आहेत. या बोअरवेलचा वापर झोपडपट्टी भागात पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी केला जातो. ३६० बोअरवेलचा वापर सार्वजनिक शौचालयांसाठी होतो. २२४ बोअरवेलना विद्युतपंप बसवण्यात आले असून त्यांचा वापर सार्वजनिक उद्याने, ठाणे महापालिकेच्या शाळा, अग्निशमन केंद्र, स्मशानभूमी, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी पिण्याव्यतिरिक्तच्या कामांसाठी केला जातो. पालिकेने १५० बोअरवेल खोदण्याचे काम सुरू केले असून त्यातील १० बोअरवेलचे काम पूर्ण झाले आहे.