किसननगर क्लस्टरमध्ये पहिल्या टप्प्यात २३ हजार लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:37 AM2021-03-07T04:37:13+5:302021-03-07T04:37:13+5:30
ठाणे : शहरातील बहुचर्चित क्लस्टर योजनेच्या (क्लस्टर) अंमलबजावणीसाठी २१ आराखड्यांना यापूर्वीच अंतिम मान्यता दिली आहे. त्यानुसार, आता पहिल्या ...
ठाणे : शहरातील बहुचर्चित क्लस्टर योजनेच्या (क्लस्टर) अंमलबजावणीसाठी २१ आराखड्यांना यापूर्वीच अंतिम मान्यता दिली आहे. त्यानुसार, आता पहिल्या टप्प्यातील किसननगरमधील २३ हजार जणांची प्राथमिक यादी महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी २० मार्चपर्यंत हरकती, सूचना मागविल्या आहेत. जयभवानीनगर सुनावणीचे काम सुरू असून ४८ हरकती प्राप्त झाल्या आहेत. तर, आझादनगर भागाची यादी तीन ते चार दिवसांत प्रसिद्ध होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. हाजुरीची ४६५ जणांची पुरवणीयादी अद्यापही प्रसिद्ध न झाल्याने येथील भागाचा विकासही लांबणीवर पडल्याचे दिसत आहे.
ठाणे शहरातील झोपडपट्ट्या, चाळी, अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचा क्लस्टर योजनेच्या माध्यमातून एकत्रित पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने शहरातील विविध भागांचे एकूण ४४ नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार केले होते. त्याचे एकूण क्षेत्र १५०९ हेक्टर इतके आहे. एकूण ४४ पैकी २१ आराखड्यांना यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार, आता वागळेतील अतिशय अवघड वाटणा-या किसननगर येथील पहिल्या टप्प्यात २३ हजार लाभार्थ्यांची यादी महापालिकेने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. ती प्राथमिक यादी असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. यामध्ये किसननगरचे दोन यूआरसी केले आहेत. त्यानुसार, आता शिल्लक असल्याचा सर्व्हे सुरू आहे. तर, जी प्राथमिक यादी प्रसिद्ध केली आहे, त्यासाठी २० मार्चपर्यंत सूचना व हरकती मागविल्या आहेत. त्यावर सुनावणी घेऊन नंतर ती अंतिम करण्यात येणार आहे.