मैत्रेय कंपनीची २४ बँक खाती गोठविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 05:00 AM2018-04-07T05:00:55+5:302018-04-07T05:00:55+5:30
मैत्रेय कंपनीने आतापर्यंत सहा हजार २०९ गुंतवणूकदारांची सुमारे १६ कोटींची फसवणूक केल्याचे ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात पुढे आले. यामुळे पोलिसांनी या कंपनीची २४ बँक खाती गोठवून कंपनीच्या विविध ठिकाणच्या ७७ मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत.
ठाणे - मैत्रेय कंपनीने आतापर्यंत सहा हजार २०९ गुंतवणूकदारांची सुमारे १६ कोटींची फसवणूक केल्याचे ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात पुढे आले. यामुळे पोलिसांनी या कंपनीची २४ बँक खाती गोठवून कंपनीच्या विविध ठिकाणच्या ७७ मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. तसेच लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर त्यांची लिलाव प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मैत्रेय कंपनीविरोधात ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई तसेच यवतमाळ, नंदुरबार आदी ठिकाणी एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. कळवा पोलीस ठाण्यात वर्षा सत्पाळकर हिच्यासह कंपनीचे संचालक अशा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर त्यांनी विजय तावरे व लक्ष्मीकांत नार्वेकर या दोघांना अटक केली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, अन्य चार जणांना फरार घोषित करून त्यांच्याविरोधात लूक आउट नोटीसही काढली आहे. याचदरम्यान, गुन्ह्याचा तपास करताना सहा हजार २०९ गुंतवणूकदारांची एकूण १५ कोटी ८० लाखांची फसवणूक झाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या निदर्शनास आले आहे. मालमत्तांच्या लिलावासाठी असलेली प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसून ती लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.