24 तासांत पोलिसांनी लावला रिक्षाचालकाच्या हत्येचा छडा, मैत्रिणीची छेड काढल्याने केली होती हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 08:52 PM2017-12-02T20:52:44+5:302017-12-02T20:53:32+5:30
कल्याणनजीक असलेल्या आडीवली येथे शुक्रवारी सकाळी सीताराम गुप्ता या रिक्षाचालकाचा मृतदेह आढळून आला होता. मानपाडा पोलिसांनी 24 तासात उलगडा करत त्याचा मित्र आरोपी पप्पू उर्फ अर्षद खानला शनिवारी अटक केली.
डोंबिवली : कल्याणनजीक असलेल्या आडीवली येथे शुक्रवारी सकाळी सीताराम गुप्ता या रिक्षाचालकाचा मृतदेह आढळून आला होता. मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरू केला होता. अखेर या हत्येचा मानपाडा पोलिसांनी 24 तासात उलगडा करत त्याचा मित्र आरोपी पप्पू उर्फ अर्षद खानला शनिवारी अटक केली. सीताराम हा अर्षदच्या मैत्रिणीला छेडायचा, त्यामुळे संतापलेल्या अर्षदने सीतारामची हत्या केल्याची कबुली अर्षदने दिली आहे. तसेच सीतारामची हत्या केल्यानंतर अर्षदने सीतारामच्या घरात चोरी केल्याचे त्याने सांगितले.
शुक्रवारी सकाळी पिसवली येथे राहणारा सीताराम गुप्ता या रिक्षाचालकाचा मृतदेह कल्याण नजीक असलेल्या आडीवली येथे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मानपाडा पोलिसानी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला. तपासात सीताराम यांची हत्या केल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत मारेक-यांचा शोध सुरू केला. यावेळी सीताराम यांचा नांदीवली येथे राहणारा मित्र पप्पू उर्फ अर्षद खान याचे त्याच्या घरी येणेजाणे असल्याची माहिती मिळाली. याआधारे पोलिसानी अर्षदला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने हत्येची कबुली देत सीताराम आपल्या मैत्रिणीची छेड काढत होता. अनेकदा समज देऊनही त्याने हा प्रकार सुरू ठेवल्याने अखेर गुरुवारी रात्री त्याला आडिवली येथे बोलवून लाकडी दांडक्याच्या सहाय्याने त्याची हत्या केल्याची, तसेच त्याची हत्या केल्यानंतर त्याच्या घरात चोरी केल्याची माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी अर्षदला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी दिली.