ठाण्याच्या दहिसर येथील धाडीत १४ बारबालांसह २४ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 09:49 PM2019-08-19T21:49:47+5:302019-08-19T21:59:11+5:30
लेडिज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील चाळे करून रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बारमध्ये ग्राहकांना आकृष्ट करणा-या १४ बारबाला तसेच बार मालकासह २४ जणांना डायघर पोलिसांनी रविवारी अटक केली.
ठाणे : रात्री उशिरापर्यंत चालणा-या पिंपरीनाका, दहिसर (डायघर) येथील एका बारवर डायघर पोलिसांनी रविवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून १४ बारबालांसह २४ जणांना अटक केली. या सर्वांची ठाणे न्यायालयाने वैयक्तिक जामिनावर सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डायघर परिसरातील दहिसर येथील रॉयल गोल्ड बारमध्ये नियमांपेक्षा जास्त बारबाला लेडिज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील चाळे करून रात्री उशिरापर्यंत नृत्य करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणे शहर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे आदींच्या पथकाने १८ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास या बारवर छापा टाकून बारमालक इंद्रमणी त्रिपाठी (४२, रा. परेल, मुंबई), व्यवस्थापक सुरेश मोगवीरा (३८, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई), डॅनिअल सरकार, प्रदीप मालिक, अमितकुमार कुमी, भागीरथ दास आणि पवन सिंह हे कर्मचारी तसेच चार गिºहाइके आणि १४ बारबाला आदी २४ जणांना अटक केली. सार्वजनिक ठिकाणी बीभत्स वर्तन केल्याप्रकरणी या बारबालांवर तसेच विहित वेळेपेक्षा जास्त वेळ बार सुरू ठेवून नियमांपेक्षा जास्त मुलींना रात्रीच्या वेळी कामावर ठेवल्याप्रकरणी बारमालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व बारबालांसह बारमालक आणि व्यवस्थापक आदी २४ जणांची प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे एक लाख ४४ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर ठाणे न्यायालयाने सुटका केली.
एखाद्या बारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीने रात्री ९.३० वाजेपर्यंत चार महिला वेटर्सना सेवा देण्याची परवानगी आहे. रात्री ९.३० वाजेनंतर केवळ चार महिला आॅर्केस्ट्रा कलाकार बारमध्ये गायनाची नोकरी करू शकतात. परंतु, या बारमध्ये १३ तरुणी अश्लील हावभाव करत ग्राहकांना आकृष्ट करत असल्याचे तसेच अश्लील नृत्य करीत ग्राहकांची लूट करत असल्याचे आढळले. पोलिसांनी छापा टाकून या सर्वांवर कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.