ठामपाच्या तिजोरीत २४१.९७ कोटींचा भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:15 AM2020-10-09T00:15:41+5:302020-10-09T00:15:49+5:30
मालमत्ताकर वसुली : यंदाचे लक्ष्य ६९0 कोटी रुपये
ठाणे : कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली. या काळातील मालमत्ताकर माफ करावा, अशी मागणी भाजपने लावून धरली होती. असे असतानाही महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ताकरापोटी २४१.९७ कोटी जमा झाले आहेत. कोरोनाकाळातही ठाणेकरांनी महापालिकेच्या हाकेला साथ देत मालमत्ताकराची रक्कम भरली आहे.
कोरोनामुळे मनपाचा आर्थिक गाडा रुळांवरून घसरला होता. मालमत्ताकर तसेच इतर करांचीही वसुली थांबली होती. त्यामुळे महापालिकेच्या विकासकामांवर परिणाम झाल्याचे दिसून आले होते. पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने ठेकेदारांची बिलेही थांबली होती. त्यानंतर पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात झाल्यानंतर ठेकेदारांना २५ टक्के बिले अदा करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मागील महिन्यात पाणीपट्टीबिलांची वसुलीही देखील चांगली झाली.
दरम्यान, एकीकडे ठाणेकरांचा तीन महिन्यांचा मालमत्ताकर माफ करावा, म्हणून भाजप आणि मनसे आक्रमक झाले होते. यावरून बॅनरवॉरही ठाण्यात रंगले होते. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता करमाफी देता येणार नसल्याचे स्पष्ट करून, ठाणेकर पालिकेला साथ देतील, असा विश्वास सत्ताधारी शिवसेनेने व्यक्त केला होता. त्यानुसार, पालिकेच्या तिजोरीत सप्टेंबरअखेरपर्यंत २४१.९७ कोटींची वसुली जमा झाली आहे. मालमत्ताकर विभागाला यंदा ६९0 कोटींचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार, आतापर्यंत २४१.९७ कोटींची वसुली झाली आहे.
महिना व वसुली
मे ०४ लाख रुपये
जून ०८ लाख रुपये
जुलै ३५.८३ कोटी
आॅगस्ट ९७.६९ कोटी
सप्टेंबर १०७.९२ कोटी
241.97 एकूण कोटी