२४,३७५ जॉबकार्ड कुटुंब बेरोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 11:00 PM2018-10-27T23:00:06+5:302018-10-27T23:00:32+5:30
विक्रमगडमध्ये रोजगार हमीची फक्त ७० कामे; प्रशासन म्हणते ग्रा.पं.स्तरावरुन प्रस्तावच नाही
- संजय नेवे
विक्रमगड : मागेल त्याला काम आणि काम करील त्याला दाम या तत्वाखाली सुरु असलेली महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार योजना विक्रमगड तालुक्यात तोकडी पडली आहे. तब्बल २४,७९५ येवढ्या मजूर कुटुंबाची नोंद असताना केवळ ४२० मजुर कुटुंबाना रोजगार मिळाला असून केवळ ७० ठिकाणी कामे सुरु आहेत. दरम्यान ग्रामपंचायतस्तरावरुन कोणतेही प्रस्ताव न आल्याने रोजगार हमीची कामे निघाली नसल्याचे प्रकल्प कार्यालयाकडून सांगण्यात आले.
महात्मा गाधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावपाडयासह मजूराना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतस्तरावर असल्याने शंभर दिवस पुरेल एवढे काम मंÞजुर करून मागेल त्याला काम या ब्रीदवाक्याने तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीत पैकी १५ ते २० ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमीची कामे सुरू आहेत. त्यापैकी डोल्हारीखु, सवादे, कासा, साखरे, दादडे, वेढेचरी, बोराडे, मोहो आंबेघर, खडकी केगवा या ग्रामपंचायत अंतर्गत घरकुलाची व शोषखड्ड्याची एकुण ७० कामे सुरू आहेत. मात्र, इतर ग्रामपंचायती अंतर्गत अजून कोणतीच कामे सुरू नसल्याने मजूराना काम शोधण्यासाठी फिरावे लागत आहेत.
रोजगार हमीची कामे वेळेत सुरू झाली तरच मजूरांचे स्थालांतर होणार नाही व रोजगार हमीची कामे देखील होतील. तसेच, इतर यंत्रणेची कामे सुरू नसल्याने मजूरानी कामाची मागणी केली आहे. तालुक्यात काही जणांना रोजगार मिळाला असून बाकीच्या मजुरानी काय करायचे असा सवाल राजा गहला यांनी केला आहे.
या घरकुलाच्या कामामुळे फक्त ४२० मजूर कुटुंबाना काम मिळाले आहे. असल्याची माहिती रोजगार हमी विभागाचे बाबासाहेब गायकवाड यांनी दिली. त्यामुळे हजारो हातांना गरज असूनही काम नसल्याची स्थिती आहे.
तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी कामे सुरू करणे आवश्यक असताना कामे सुरू होत नाहीत त्यामुळे मजूराना स्थंलातर करावे लागत आहे. शेतीची कामे संपली असल्याने बिकट स्थिती आहे.