शालेय साहित्यखरेदीसाठी अडीच कोटींचा खर्च
By admin | Published: May 4, 2017 05:40 AM2017-05-04T05:40:37+5:302017-05-04T05:40:37+5:30
दरवर्षी शालेय साहित्यखरेदी करताना शिक्षण विभागाकडून होणारा विलंब आणि यात चव्हाट्यावर येत असलेला भोंगळ
कल्याण : दरवर्षी शालेय साहित्यखरेदी करताना शिक्षण विभागाकडून होणारा विलंब आणि यात चव्हाट्यावर येत असलेला भोंगळ कारभार, याला चाप बसावा, यासाठी सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाला एप्रिलच्या शिक्षण समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली होती. असे असताना शनिवारी बोलावलेल्या सभेत हा प्रस्ताव पुन्हा प्रशासनाने पटलावर ठेवला आहे. शालेय साहित्यखरेदीसाठी दोन कोटी ४६ लाखांचा खर्च येणार असून ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे.
डिसेंबर २०१६ मध्ये सरकारने हा अध्यादेश जारी केला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तूस्वरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबतचा हा अध्यादेश आहे. यामुळे लाभार्थ्यांना योजनांचा पूर्णपणे लाभ मिळेल आणि अनावश्यक गोष्टी टळू शकतील, असा सरकारचा उद्देश आहे. नवीन शिक्षण समिती स्थापन झाल्यानंतर १२ एप्रिलला समितीची पहिली सभा झाली. यात सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी हा अध्यादेश समितीसमोर मांडला होता. याला सर्वच सदस्यांनी एकमताने मान्यता दिली होती. दोन महिन्यांत सुटीच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याची कार्यवाही पूर्ण करा, असे आदेश गुजर-घोलप यांनी प्रभारी शिक्षण अधिकारी जे.जे. तडवी यांना दिले. वेळेवर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले पाहिजे. त्यात दिरंगाई होता कामा नये, अशा सूचना सदस्य प्रभाकर जाधव आणि निलेश म्हात्रे, सुनीता खंडागळे यांनी केल्या होत्या. २७ गावांमधील शाळांमध्येही शालेय साहित्यांचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, हा प्रस्ताव अशासकीय असल्याने तो प्रशासनाकडून दाखल करण्याचे आदेश त्यावेळी देण्यात आले होते. त्यानुसार, हा प्रस्ताव शनिवारच्या सभेत पुन्हा पटलावर संपूर्ण माहितीनिशी दाखल करण्यात आला आहे. यात अंदाजित खर्च दोन कोटी ४६ लाख ७ हजार ८२६ रुपये अपेक्षित आहे. यात गणवेश, दप्तर, वह्या, रेनकोट, पीटी ड्रेस आदींची खरेदी केली जाईल. केडीएमसीच्या ९ हजार ११८ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. हे शालेय साहित्य २७ गावांमधील विद्यार्थ्यांनादेखील दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)
मागील वर्षी तीन कोटी ३२ लाखांचा खर्च
मागील वर्षी शालेय साहित्यखरेदीसाठी तीन कोटी ३२ लाखांचा खर्च आला होता. यात गणवेश, दप्तर, रेनकोट, वह्या, कंपासपेटी, बूट,मोजे आदींचा समावेश होता.
विशेष म्हणजे २०१६-१७ या कालावधीत खरेदी केलेल्या साहित्याप्रकरणी संबंधित पुरवठादारास अद्याप त्याचे बिल अदा केलेले नाही. हा खर्च २०१७-१८ वर्षातील उपलब्ध तरतुदीनुसार अदा केले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.