कुळगांव बदलापूर नगरपालिकेच्या प्रशासकीय ईमारतीसाठी राज्य शासनाकडून 25 कोटींचा निधी मंजूर
By पंकज पाटील | Published: April 20, 2023 06:19 PM2023-04-20T18:19:05+5:302023-04-20T18:19:21+5:30
बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी राज्य शासनाने तब्बल 25 कोटी रुपये मंजूर केले आहे. हा निधी ...
बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी राज्य शासनाने तब्बल 25 कोटी रुपये मंजूर केले आहे. हा निधी मंजूर झाल्याने आता प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती मिळणार आहे. 15 ऑगस्टच्या आत या इमारतीचे काम पूर्ण करण्याचा मानस असण्याचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.
कुळगांव बदलापूर नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी राज्य सरकारकडून निधी मिळावा यासाठी कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वामन म्हात्रे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होते. त्याला यश आले आहे, राज्य शासनाने या प्रशासकीय इमारतीसाठी निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय झाला आहे. त्यामुळे लवकरच या इमारतीच्या उर्वरित कामाला गती मिळणार आहे. सुमारे एक लाख वीस हजार चौरस फुटाचं बांधकाम असलेल्या भव्य दिव्य प्रशासकीय इमारतीत भविष्यातील महापालिकेच्या दृष्टिकोनातून या इमारतीचे उभारणी करण्यात आली आहे. सुसज्ज पार्किंग, आधुनिक आणि सेंट्रलाईज एसी व्यवस्था, तीन लिफ्ट यांच्यासह विविध विभागांसाठी स्वतंत्र दालनाची ही व्यवस्था या इमारतीत करण्यात आली आहे. सध्या या इमारतीचे जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करणार असल्याचे शहर अभियंता संजय कुंभार यांनी सांगितले.
प्रशासकीय इमारतीसाठी 48 कोटींचा खर्च
बदलापूर नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी तब्बल 48 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे त्यातील 30 कोटी रुपये राज्य शासनाने निधी स्वरूपात पुरवले आहे तर उर्वरित रक्कम पालिका प्रशासन स्वतः उभारणार आहे. # बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने साडेतीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि आजूबाजूचा परिसर सुशोभीकरण आणि विकासासाठी हा निधी मंजूर केला आहे.साडे सात एकर परिसरात हे भव्यदिवस स्मारक उभे राहत असून महाराष्ट्रातील सर्वात मोठे असे हे स्मारक असेल. त्यामुळे राज्य शासनाने या प्रकल्पाला गती देण्यासाठी भरीव निधी मंजूर केल्याने येत्या काही महिन्यातच येथे काम पूर्ण होऊन स्मारकाचे उद्घाटन करणार असल्याचे वामन म्हात्रे यांनी सांगितले