ठाणे कारागृहातील 25 कैदी झाले कोराेनाने बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 11:56 PM2021-04-20T23:56:54+5:302021-04-20T23:57:02+5:30
एकाच दिवसात पाच जणांना लागण : आतापर्यंत ५८ बाधित
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील पाच कैद्यांना मंगळवारी कोरोनाची बाधा झाली असून, गेल्या एक आठवड्यामध्ये २५ जण बाधित झाले आहेत. गेल्या वर्षभरात ५८ कैदी बाधित झाले. आतापर्यंत ३३ न्याय बंदी कोरोनामुक्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचा फटका ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील न्यायालयीन बंदी तसेच कारागृह पोलिसांनाही बसला आहे. मंगळवारी (२० एप्रिल) रोजी एकाच दिवसात पाच कैदी बाधित झाले. त्यांना ठाणे महापालिकेच्या भाईंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रात ठेवले आहे. सध्या २५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे सर्व बंदी २५ ते ४० वयोगटातील आहेत. न्यायालयात सुनावणीसाठी येणे जाणे, मुंबईतील जे. जे. रुग्णालयात किंवा ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात तसेच कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी या कैद्यांना नेले जाते. त्याचवेळी त्यांना हे संक्रमण झाल्याची शक्यता कारागृह प्रशासनाने व्यक्त केली आहे. कारागृहात सध्या तीन हजार ८५१ इतके बंदी आहेत. यामध्ये शिक्षा झालेले १२२ तर न्यायाधीन तीन हजार ७३० बंदी आहेत. या सर्वांची कारागृहातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत नियमित तपासणी केली जाते. त्याच्याबरोबरच कारागृहातील अधिकारी, कर्मचारी यांचे थर्मल चेकअप तसेच दररोज दोन वेळा ऑक्सिमीटरने ऑक्सिजन पातळी तपासली जाते. ज्यांना कोरोनाची लक्षणे आढळली त्यांना वेगळे ठेवले जाते.
याशिवाय, रोज ५० कैद्यांची आरोग्य तपासणी केली जाते, अशी माहिती कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी दिली.
५८ कर्मचारी कोरोनामुक्त
ठाणे मध्यवर्ती कारागृहातील ६० कर्मचारी आतापर्यंत कोरोनामुळे बाधित झाले. त्यातील ५८ कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून, दोघांवर सध्या घरीच उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्या २५ कैद्यांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर दोन कर्मचारीही सध्या बाधित आहेत. आतापर्यंत ३३ कैदी आणि ५८ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. कारागृहात येणाऱ्या प्रत्येकाचे रोज थर्मल चेकअप आणि ऑक्सिजन पातळीही तपासली जाते.
हर्षद अहिरराव, अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, ठाणे.