ठाण्यात साकारला जातोय २५ किमीचा मॉडेल सायकल ट्रॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 05:47 PM2018-06-15T17:47:45+5:302018-06-15T17:47:45+5:30
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात सध्या मॉडेल सायकल ट्रॅक विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा ट्रॅक तब्बल २५ किमीचा असणार आहे.
ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात २५ किमी लांबीचा मॉडेल सायकल ट्रॅक निर्माण करण्यात येत असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी या ट्रॅकची पाहणी केली.
परिसर सुधार योजनेतंर्गत या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात येत असून या अंतर्गत ठाणे पूर्व आणि पश्चिमेलगत रस्त्यावर हा सायकल ट्रॅक उभारण्यात येत आहे. यामध्ये वागळे इस्टेटमध्ये रोड नं. १६, १६ झेड, रोड नं. ३३, ३४ या रस्त्यांवर ५ किमी लांबीचा, देवदयानगर, बॅ. नाथ पा रोड ते नीळकंठ वूडस आण िपोखरण रोड नं. १,२,३ या रस्त्यांवर १२ किमी लांबीचा ट्रॅक तर स्टेशन परिसरात १२ ते १३ किमी लांबीचा सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे. हा ट्रॅक साधारणत: तीन ते साडे तीन किमी लांबीचा बनविण्यात येणार असून त्यावर सायकलधारकांना एकाचवेळी ये-जा करण्यास शक्य होणार आहे. दरम्यान परिवहन सेवेचे बस निवारे आणि नव्याने उभारण्यात येणारे सायकल स्टॅन्डस् याच्याशी हे सायकल ट्रॅक्स जोडण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. सदर सायकल ट्रॅक हा पूर्णत: सायकलसाठीच वापरण्यात येणार असून त्या ट्रॅकवर वाहने पार्कींग होणार नाहीत याची दक्षता घेतानाच पार्किंगसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी बांधकाम विभागास दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त संदीप माळवी, कार्यकारी अभियंता मोहन कलाल आदी उपस्थित होते.