२५ पुरुषांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ठरल्या अयशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:58 AM2020-02-16T01:58:17+5:302020-02-16T01:58:34+5:30
जिल्ह्यातील चार वर्षांची आकडेवारी । प्रत्येकी ६० हजारांची नुकसानभरपाई
सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम गावखेड्यांमध्ये कुटुंब नियोजन योजनेंतर्गत गेल्या चार वर्षांत केलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांपैकी २५ पुरुषांची नसबंदी अयशस्वी ठरल्याची माहिती उघडकीस आली आहे. या पुरुषांना केंद्र आणि राज्य शासनाकडून ६० हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. लोकसंख्या कमी करण्यासाठी राज्यसभेत शिवसेनेकडून काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. ज्या कुटुंबात दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत, त्यांच्या सर्व सवलती रद्द करण्याची मागणीही लावून धरण्यात आली आहे.
पुरुषांची नसबंदी करणे, हादेखील एक महत्त्वाचा उपाय असला तरी, लोकसंख्येस आळा घालण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या चार वर्षांत २६ पुरुषांवरील शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्या. त्यापैकी २५ जणांच्या शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या होऊन त्या अयशस्वी ठरल्या, तर एकाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाणे यांनी सांगितले. या काळात किती पुरुषांच्या यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या. याविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेघे यांना विचारणा केली असता, तशी सविस्तर माहिती सांगणे सध्या शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यामुळे आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
ज्या पुरुषांच्या या शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्या, त्यांना केंद्र शासनाकडून ३० हजार रुपये व राज्य शासनाकडून ३० हजार रुपये देण्याच्या मुद्यावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीत मंगळवारी चर्चा झाली.
२६ पुरुषांपैकी २०१६ साली सात जणांच्या शस्त्रक्रिया अपयशी ठरल्या. याशिवाय, याच वर्षी एकाचा मृत्यू झाला. २०१७ साली सात जणांच्या शस्त्रक्रियांमध्ये गुंतागुंत होऊन त्या अयशस्वी ठरल्या.
२०१८ मध्येही सात जणांच्या शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या होऊन त्या अयशस्वी ठरल्या. याशिवाय, २०१९ साली चार शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचे निदर्शनास आले आहे.महापालिकेसाठी जिकिरीचे ठरू लागले आहे.