अंबरनाथच्या भाजी मंडईत 25 ते 30 नागरिकांना कुत्र्याचा चावा
By पंकज पाटील | Published: July 28, 2023 06:08 PM2023-07-28T18:08:29+5:302023-07-28T18:08:44+5:30
अंबरनाथ स्टेशन परिसरातच छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई असून या भाजी मंडईमध्ये भाजी खरेदीसाठी आलेल्या काही नागरिकांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला.
अंबरनाथ: अंबरनाथच्या भाजी मंडई परिसरामध्ये गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने 25 ते 30 नागरिकांना चावा घेतला आहे. एकाच वेळी एवढ्या नागरिकांना चावा घेतल्याने शासनाच्या छाया रुग्णालयात उपचार घेण्यासाठी या नागरिकांना रांगेत उभे राहण्याची वेळ आली. चावा घेतलेला प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे.
अंबरनाथ स्टेशन परिसरातच छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई असून या भाजी मंडईमध्ये भाजी खरेदीसाठी आलेल्या काही नागरिकांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. त्या कुत्र्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न ज्या नागरिकांनी आणि दुकानदारांनी केला त्यांना देखील या कुत्र्याने चावा घेतला. तब्बल तासभर या कुत्र्याची दहशत भाजी मंडई परिसरात होती.
या तासाभरात 25 हून अधिक नागरिकांना या कुत्र्याने चावे घेतले. हा प्रकार घडल्यानंतर लागलीच स्थानिक रहिवासी शासनाच्या छाया रुग्णालयात उपचारासाठी आले. या ठिकाणी एकाच वेळी उपचारासाठी नागरिक आल्याने प्रत्येकाला रांगेत उभे राहून डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे लागले.
रात्री छाया रुग्णालयात देखील रुग्णांची गर्दी झाल्याने काहीसी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर दुसरीकडे या या पिसाळलेला कुत्र्याचा योग्य बंदोबस्त पालिका प्रशासनाने करावा एवढी माफक अपेक्षा नागरिकांनी केली आहे.