धान्य महोत्सवात २५ टन धान्यविक्री
By Admin | Published: May 6, 2017 05:54 AM2017-05-06T05:54:20+5:302017-05-06T05:54:20+5:30
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने गावदेवी मैदानात आयोजिलेल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने गावदेवी मैदानात आयोजिलेल्या धान्य महोत्सवाला ठाणेकर नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून ४ दिवसांत सुमारे २५ टन धान्याची विक्री झाली असून त्यातून जवळपास १० ते १२ लाखांची उलाढाल झाली आहे.
नाम फाउंडेशन व संस्कार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा धान्य महोत्सव १ ते ४ मे दरम्यान आयोजिला होता. गुरुवारी या धान्य महोत्सवाचा समारोप झाला. हिंगोली, बीड जिल्ह्यांतील जवळपास १०० शेतकऱ्यांनी येथे धान्य विक्रीसाठी आणले होते. गहू, तांदूळ, तूरडाळ, मूगडाळ, ज्वारी, चवळी, सेंद्रिय हळद, मसाले आदी विविध धान्य, कडधान्य विक्र ीसाठी ठेवले होते.
यात गव्हाची सुमारे ७ ते ८ टन, तूरडाळ ५ ते ६ टन, ज्वारी ६ ते ७ टन, मूगडाळीची २ ते ३ टन इतकी विक्र ी झाल्याचे नामच्या मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. नाम आणि संस्कार यांच्या सहकार्यामुळे आम्ही कोणत्याही दलालाच्या मध्यस्थीशिवाय आमचा माल विकू शकलो. यापुढेही पुन्हा असा महोत्सव आयोजित केल्यास आम्ही तेथेही आमचे धान्य विक्रीसाठी आणू, अशा शब्दांत सहभागी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
महोत्सवात सहभागी झालेला आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी कृषी महाराष्ट्रभूषण हा राज्य सरकारचा पुरस्कार मिळालेल्या शिवराम बोडके या तरुण शेतकऱ्याने सर्वांच्या वतीने नाम आणि संस्कार संस्थेचे आभार मानले. या वेळी संस्कार संस्थेचे अध्यक्ष आ. संजय केळकर, अमोल गोऱ्हे उपस्थित होते.
शनिवार ६ ते १० मे पर्यंत धान्य महोत्सव माझी आई शाळा, ऋ तू पार्कजवळ, पातलीपाडा, ठाणे (प.) येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत होणार आहे. त्यालाही ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नाम आणि संस्कारच्या वतीने करण्यात आले आहे.
महोत्सवाला उत्तम प्रतिसाद
नाम आणि संस्कार यांच्या सहकार्यामुळे आम्ही आमचा माल कोणत्याही दलालाच्या मध्यस्थीशिवाय विकू शकलो. यापुढेही पुन्हा असा महोत्सव आयोजित केल्यास आम्ही त्यातही आमचे धान्य विक्रीसाठी आणू, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.