जोरदार वा-यासह झालेल्या पावसामुळे डोंबिवलीत पडली 25 झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 03:19 PM2018-09-28T15:19:28+5:302018-09-28T15:19:30+5:30
वा-यासह जोरदार झालेल्या पावसामुळे डोंबिवली औद्योगिक परिसरात 25 झाडे कोसळून पडल्याची घटना घडली आहे.
डोंबिवली-गुरुवारी सायंकाळी झालेल्या वा-यासह जोरदार झालेल्या पावसामुळे डोंबिवली औद्योगिक परिसरात 25 झाडे कोसळून पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत बंगले, इमारती आणि शाळेचे नुकसान झाले आहे. एक झाड रस्त्यावर पडल्याने तासभर वाहतूक कोंडी झाली होती. या वेळी बत्ती गुल झाल्याने अंधारात नेमके काय होत आहे, याची कल्पनाच नागरिकांना येत नव्हती.
डोंबिवली परिसरात गुरुवारी सायंकाळी सहा वाजता जोरदार वा-यासह पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होता. याच वेळी उस्मा पेट्रोल पंपाजवळ एक झाड रस्त्यातच कोसळले. त्यामुळे एक तास वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागला. ग्रीन्स शाळा, सुदर्शननगर, सिस्टर निवेदिता शाळा, सेंट जोसेफ शाळा, बदाम गल्ली, पेंढरकर कॉलेज या परिसरात जवळपास 25 झाडे पाऊस वा-यामुळे पडली. हा प्रकार कळताच अग्निशमन दलाशी संपर्क केला गेला. अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच महापालिकेच्या प्रभाग क्षेत्रतील सफाई कामगारांच्या मदतीने रस्त्यात पडलेली झाडे, त्याच्या फांद्या दूर हटविण्याचे काम सकाळपर्यंत सुरू होते.
कृष्णाई बंगल्याच्या टेरेसवरील सिमेंटच्या पत्र्यावर झाड पडल्याने पत्रे फुटले आहेत. ग्रीन्स शाळेचे पत्र्यांचेही नुकसान झाले आहे. पडलेल्या झाडांमध्ये गुलमोहर, बदाम आदी झाडांचा समावेश आहे. गुलमोहरांची झाडे कमकुवत असल्याने जोरदार वा-यात ही झाडे प्रथम कोसळतात. मात्र बदामाचे झाड हे जाड बुंध्याचे असते. तसेच ते भक्कम असते. ते देखील कोसळले आहे. एका विशिष्ट परिसरात पावसाचा हा जोरदार परिमाण दिसून आला. त्याची झळ झाडांना जास्त बसली याविषयी नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एक झाड इतक्या जोरात कोसळले त्याठिकाणी असलेले नागरिक प्रदीप राजे यांच्या अंगावर कोसळणार होते. या घटनेतून राजे बचावले आहे. अन्यथा ते जखमी झाले असते.