मानकोली -मोठागाव दरम्यान २५०० मिमी व्यासाची नवी जलवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:14 AM2021-03-13T05:14:33+5:302021-03-13T05:14:33+5:30

ठाणे : मानकोली ते मोठागाव रस्त्याच्या कामामध्ये महापालिकेची आणि स्टेम प्राधिकरणाची मोठी व्यासाची जलवाहिनी बाधित होणार असल्याने ती ...

2500 mm new aqueduct between Mankoli-Mothagaon | मानकोली -मोठागाव दरम्यान २५०० मिमी व्यासाची नवी जलवाहिनी

मानकोली -मोठागाव दरम्यान २५०० मिमी व्यासाची नवी जलवाहिनी

Next

ठाणे : मानकोली ते मोठागाव रस्त्याच्या कामामध्ये महापालिकेची आणि स्टेम प्राधिकरणाची मोठी व्यासाची जलवाहिनी बाधित होणार असल्याने ती हटवून भविष्यातील पाणी पुरवठ्याचा विचार करून नवी वाढीव २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. या रस्त्यावर स्टीलचा पूल बांधून त्यावरून जलवाहिन्या टाकण्यात येणार असून यावर १८ कोटी २४ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. हा संपूर्ण खर्च एमएमआरडीए उचलणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये विविध स्त्रोतांमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी, महापालिकेची स्वत:ची योजना आणि मुंबई महापालिका या स्त्राेतांचा समावेश आहे. हे स्त्रोत भातसा तसेच उल्हास नदीच्या पात्रातून पाणी उचलून त्याचा ठाणे शहरात पुरवठा करतात. त्यासाठी नदीपात्रापासून ते शहरापर्यंत मोठ्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. अशाच प्रकारे मानकोली परिसरात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेची २०४४ मिमी व्यासाची तर स्टेमची १५३० मिमी व्यासाची जलवाहिनी आहे. या दोन्ही वाहिन्या मानकोली ते मोठागाव रस्त्याच्या कामामध्ये बाधित होत आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने महापालिकेला पत्र पाठविले होते. त्यामध्ये दोन्ही जलवाहिन्या स्थलांतरित करून त्यासाठी येणारा खर्च देण्यासंबंधी कळविले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने दोन्ही जलवाहिन्या स्थलांतरित करण्याच्या कामाचा सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. त्यामध्ये जलवाहिन्या स्थलांतरित करताना भविष्यातील पाणीपुरवठ्याचा विचार करून त्या वाढीव म्हणजेच २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. या कामासाठी १८ कोटी २४ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च एमएमआरडीएकडून प्राप्त झाल्यानंतर या कामाची निविदा काढून त्यानंतर जलवाहिन्या स्थलांतरित करण्याचे काम करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

या जलवाहिन्यांसाठी स्टीलचा पूल बांधणार असून त्यासाठी २ कोटी ९९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच व्हॉल्व चेंबर्सचे बांधकामही करण्यात येणार असून त्यासाठी ३८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. ही दोन्ही कामेही एमएमआरडीए करणार आहे. त्यामुळे या कामांसाठी जीएसटीसह एकूण १८ कोटी २४ लाख रुपये खर्च येणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.

Web Title: 2500 mm new aqueduct between Mankoli-Mothagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.