२५०० पोलीस तैनात
By admin | Published: February 20, 2017 06:00 AM2017-02-20T06:00:23+5:302017-02-20T06:00:23+5:30
वेगवेगळ्या पक्षांतील आयारामांमुळे असलेली अस्वस्थता, अंतर्गत संघर्ष आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा राजरोस वावर
उल्हासनगर : वेगवेगळ्या पक्षांतील आयारामांमुळे असलेली अस्वस्थता, अंतर्गत संघर्ष आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा राजरोस वावर, यामुळे उल्हासनगरच्या मतदानावेळी तणाव निर्माण होऊ नये, यासाठी तब्बल २५०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
संवेदनशील मतदान केंद्रांसह अन्य प्रभागांत गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवला जाणार आहे. ४१ फ्लॅश
पॉइंट पोलिसांनी स्थापन केले
आहेत. शहरात ३० मतदान केंदे्र संवेदनशील असून त्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी दिली.
उल्हासनगरमधील ५४३ पैकी ३० मतदान केंदे्र संवेदनशील आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी साडेतीन
हजार कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत.
शहरात निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तीन पोलीस उपायुक्त, सहा सहायक पोलीस आयुक्त, ४८ पोलीस निरीक्षक, १५०० पोलीस कर्मचारी, ४०० होमगार्ड, एसआरपीच्या दोन तुकड्या (एका तुकडीत १०० सुरक्षा सैनिक), १०० सुरक्षारक्षकांचे अत्यावश्यक पथक आदींसह २५०० पेक्षा जास्त पोलीस तैनात ठेवले आहेत.
याशिवाय, प्रत्येक प्रभागासाठी एक पोलीस पथक आरक्षित ठेवून त्यात एका पोलीस निरीक्षकासह ७ पोलीस कर्मचारी असतील. ७२ बिटमार्शलसाठी ३६ मोटारसायकली तैनात असतील. त्यांना विशेष
मार्ग देण्यात आला आहे. संवेदनशील प्रभाग, चौक, जुने राजकीय वैर असलेल्या ४१ ठिकाणी फ्लॅश पॉइंट स्थापन
केले असून तक्रार मिळताच तीन मिनिटांत पोलीस पथक पोहोचण्याची व्यवस्था केल्याची माहिती त्यांनी दिली. संवेदनशील मतदान केंद्रांसह प्रभागात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. विविध ठिकाणी नाकेबंदी सुरू केली असून प्रत्येक पोलीस स्टेशनला विशेष गाडीसह पोलीस पथक देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांची नाकाबंदी सुरू
च्निवडणूक प्रचारासाठी शहराच्या बाहेरून आलेल्या विविध पक्ष कार्यकर्त्यांसह नेत्यांना प्रचाराच्या समाप्तीनंतर शहर सोडण्यास सांगितले आहे. त्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. शहरातील हॉटेल, लॉज, पक्ष कार्यालय आदींची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे.
च्कार्यकर्त्यांसह बाहेरच्या नेत्यांनी शहराबाहेर जावे, असे त्यांना सुचवण्यात आले आहे. मात्र, गुन्हे दाखल करून काहींना तुरुंगात टाकत ‘कल्याण पॅटर्न’ राबवला जाईल, अशी भीती शिवसेनेच्या नेत्यांसह साई, रिपाइं, मनसेसह लहान पक्षांनी व्यक्त केली आहे. भाजपाविरोधात त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. ओमी टीम सदस्यांसह इतरांकडून प्राणघातक हल्ला होईल, खोटे गुन्हे दाखल होतील, अशी भीती व्यक्त केली आहे.