२५००० बोगस रिक्षा बुलडोझरखाली चिरडा; कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघ झाला आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:19 AM2018-03-22T03:19:51+5:302018-03-22T03:19:51+5:30
ठाणे रिजनमध्ये २५ हजार अवैध रिक्षा धावत असून कारवाईदरम्यान ज्याज्या अवैध रिक्षा सापडतील, त्या सर्व रिक्षांवर तत्काळ बुलडोझर फिरवावा, तरच त्यांना आळा बसेल, अशी मागणी बुधवारी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी रिक्षा-टॅक्सी पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.
ठाणे : ठाणे रिजनमध्ये २५ हजार अवैध रिक्षा धावत असून कारवाईदरम्यान ज्याज्या अवैध रिक्षा सापडतील, त्या सर्व रिक्षांवर तत्काळ बुलडोझर फिरवावा, तरच त्यांना आळा बसेल, अशी मागणी बुधवारी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी रिक्षा-टॅक्सी पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.
सध्या सुरू असलेल्या रिक्षा परमिटवाटपामुळे जो तो रिक्षामालक होऊ पाहत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची फळीच संपुष्टात आली आहे. त्यातच, परमिट घेण्यासाठी रिक्षावाल्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्याने भविष्यात कर्जबाजारी होऊन त्यांच्यावरही शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्येची वेळ येईल. त्यामुळे लोकसंख्या लक्षात घेऊन परमिटचे वाटप करावे, असे त्यांनी सुचवले.
ओला आणि उबेर यांच्यामुळे रिक्षावाल्यांचे नुकसान झाले आहे, असे सांगत पेणकर यांनी त्या कंपन्या बेकायदा खाजगी प्रवासी वाहतूक करत आहेत. तसेच त्यांना कोणतेही कायदे, नियमांचे बंधन नाही. त्यामुळे त्यांना कायद्याच्या कक्षेत आणावे आणि मगच परवानगी द्यावी, अशी मागणी केली. काल रिक्षा बॅज घेतलेल्या आणि वास्तव्याचा दाखला नसलेल्यांनाही रिक्षा परमिट मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. बॅज मिळाल्यानंतर तीन वर्षे पूर्ण झाल्यावर परमिटचे वाटप करावे तसेच रिक्षा आणल्यावर ते द्यावे, अशी मागणी केली. रिक्षा-टॅक्सीचे १० टक्के क्लेम (इन्शुरन्स) विमा पॉलिसी कंपनी यांच्याक डे होत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री, राज्य परिवहनमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा क रणार आहोत. तरीसुद्धा त्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महासंघाने दिला.
अडचणींवर झाली चर्चा
ठाणे जिल्हा कोकण विभाग आणि एमएमआरडीए क्षेत्रातील आॅटो रिक्षा, टॅक्सीचालकांच्या विविध अडचणी- समस्या, शासनाने रिक्षा, टॅक्सी मुक्त (खुले) केलेले परवाने बंद करावेत किंवा ५ ते १० वर्षांपर्यंत स्थगिती द्यावी, यासंदर्भात ठाण्यात रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा हा मेळावा झाला.
न जुमानणारी पिढी
रिक्षा चालवण्याच्या व्यवसायात येणे सोपे असल्याने दररोज ५० ते १०० जण त्यात उतरत असल्याने एकीकडे त्यांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये १६ ते १७ वर्षीय मुलांचाही समावेश आहे. पण ही मंडळी कोणत्याही युिनयनला जुमानत नाही. नियम पाळत नाहीत, असा आक्षेप घेण्यात आला.