वरिष्ठ पोलिस निरीक्षकाविरुद्ध याचिका करणाऱ्याला २५ हजारांचा दंड
By धीरज परब | Published: July 13, 2023 08:10 PM2023-07-13T20:10:56+5:302023-07-13T20:11:04+5:30
न्यायालयाने याचिका दाखल करून घेत चौकशीचे आदेश दिले.
मीरारोड - मीरारोडच्या नया नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या विरुद्ध याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने २५ हजारांचा दंड लावत याचिका फेटाळून लावली. न्यायालयास खोटी माहिती देऊन दिशाभूल केली म्हणून न्यायालयाने कारवाईचा बडगा उगारला.
मीरारोडच्या प्रियल इमारतीतील सदनिकेत याचिकाकर्ता खुर्शीद अन्सारी (३८) राहत होता. खुर्शीद हा सदनिकेचा बेकायदेशीर कब्जा करून राहतोय समजल्यावर सदनिकेचे मूळ मालक व गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नया नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. ११ जून रोजी सोसायटी सदस्य व खुर्शीद यांच्यात वाद झाल्याने खुर्शीद यांनी पोलिस नियंत्रण कक्षला कॉल करून पोलिस ठाण्यात तक्रारी साठी गेले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी खुर्शीदला सदनिकेच्या मालकी हक्क ची कागदपत्रे सादर करा अन्यथा बेकायदा सदनिकेत राहतो म्हणून गुन्हा दाखल करावा लागेल असे सांगितले. सोसायटीचे सदस्य आणि खुर्शीद यांनी आपापसात वाद मिटवू सांगून नंतर त्यांनी सदनिका रिकामी केली.
नंतर मात्र खुर्शीद याने, वनकोटी यांनी पोलीस ठाण्यात डांबले, खंडणी मागीतली आणि धमकावून सदनिका खाली करण्याचा दबाव टाकल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली.
न्यायालयाने याचिका दाखल करून घेत चौकशीचे आदेश दिले. वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी चौकशी करून न्यायालया समोर अहवाल सादर केला. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती मोहीते-ढेरे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते खुर्शींद अन्सारीची याचिका फेटाळून लावत त्याला २५ हजारांचा दंड ठोठावला.