ठाणे शहर आयुक्तालयात बंदप्रकरणी २६ गुन्हे दाखल, ५५ आंदोलकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 08:49 PM2018-01-04T20:49:51+5:302018-01-04T21:12:40+5:30
वाहनांची जाळपोळ, दगडफेक करणा-या ५५ आंदोलकांविरुद्ध एकूण २६ गुन्हे दाखल केल्याची माहिती सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही ते म्हणाले.
ठाणे : कोरेगाव भिमा घटनेच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदच्या दरम्यान ठाणे शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये एकूण २६ गुन्हे दाखल झाले असून जवळपास ५० ते ६० आंदोलकांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. बंदच्या दरम्यान खोट्या पोस्ट टाकून अफवा पसरविण्याचा प्रयत्न समाज माध्यमातून झाला. या काळात चार अधिक-यांसह १४ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बुधवारच्या राज्यव्यापी बंद ला ठाणे जिल्हयातही प्रतिसाद मिळाला. काही तुरळक घटना वगळता बंद शांततेत पार पडला. जाळपोळ करणे, वाहनांची तोडफोड करणे, धक्काबुक्की करणे, दगडफेक करणे आदी कलमांखाली आयुक्तालयातील वेगवेगळया पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २६ गुन्हे दाखल केल्याची माहिती सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली. आतापर्यंत ५५ कार्यकर्त्यांना अटक झाली असून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही ते म्हणाले. आंदोलकांच्या दगडफेकीत चार अधिकारी तसेच दहा कर्मचारी असे १४ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, या आंदोलनाचा संपूर्ण तपशील गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्वाधिक १४ गुन्हे कल्याण परिमंडळातील कार्यक्षेत्रात दाखल झाले असून त्यापाठोपाठ वागळे इस्टेट ५, भिवंडी ४ आणि उल्हासनगर तसेच ठाणे परिमंडळात प्रत्येकी एक असे गुन्हे दाखल झाले आहेत.
‘बंद’च्या काळात आंदोलनासंदर्भातील अफवा पसरविणाºया वेगवेगळ्या पोस्ट समाज माध्यमांवर दिवसभर टाकण्यात येत होत्या. वाहतूक सुरळीत असताना जुने फोटो टाकून लोकांची दिशाभूल करण्याचेही प्रकार घडले. त्याचप्रमाणे हिंसाचाराचे जुने फोटो टाकून लोकांना भडकवण्याचा प्रयत्नही काही समाजकंटकांनी केला. याप्रकरणी चौकशी करण्याच्या सुचना गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर सेलच्या युनिटला देण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार योग्य ती कारवाईदेखील केली जाईल, असेही पाण्डेय यांनी स्पष्ट केले.