ठाणे जिल्ह्यात पावसाचे तब्बल २६ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 02:49 AM2019-08-12T02:49:49+5:302019-08-12T02:50:39+5:30

गतआठवड्यात ठाणे जिल्ह्याला पुराचा मोठा तडाखा बसून, शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. आतापर्यंत या आपत्तीत २६ जणांचा मृत्यू झाला.

26 death's due to rain in Thane district | ठाणे जिल्ह्यात पावसाचे तब्बल २६ बळी

ठाणे जिल्ह्यात पावसाचे तब्बल २६ बळी

googlenewsNext

- सुरेश लोखंडे

ठाणे : गतआठवड्यात ठाणे जिल्ह्याला पुराचा मोठा तडाखा बसून, शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. आतापर्यंत या आपत्तीत २६ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना तसेच घरात पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून जिल्ह्याला २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातून पूरग्रस्तांना भरपाईचे काम महसूल यंत्रणेकडून सुरू झाले आहे.

ठाणे जिल्ह्याला २६ व २७ जुलै रोजी, तसेच ४ आॅगस्ट रोजी मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला. पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यामुळे निवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे जिल्ह्यातील १० हजार २७५ खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे. त्याचे पंचनामेही झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमध्ये एक हजार ५१८ घरांची पूर्णत:, तर काहींची अंशत: पडझड झाली. जिल्हाभरात तब्बल २६ जणांचा या आपत्तीत मृत्यू झाला. या अतिवृष्टीमुळे सहा हजार १०० कुटुंबं व ५०० व्यक्ती तात्पुरत्या स्वरूपात निराधार झाल्या होत्या. मुक्या जीवांचाही यावेळी बळी गेला. गायी, म्हशी, शेळ्यामेंढ्या यासारखी १०४ जनावरे पुराच्या पाण्यात वाहून मृत्युमुखी पडल्याचे जिल्हा प्रशासनाच्या गेल्या दोन दिवसांपर्यंतच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

या आपत्तीत बळी गेलेल्या व्यक्तींसह घरांचे, शेतीचे व जनावरांचे नुकसान झालेल्यांचे शेकडो पंचनामे जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाने केले आहेत. मृतांच्या आकड्यात आणि पर्यायाने पंचनाम्यांच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंतचे पंचनाम्यांचे आकडे विचारात घेऊन पात्र आपत्तीग्रस्तांना भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. शासनाच्या नव्या अध्यादेशास अनुसरून जिल्ह्यातील या पंचनाम्यांमधील नुकसानभरपाईसाठी सुमारे २० कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनास मंजूर झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यातून महसूल विभागाच्या यंत्रणेकडून संबंधित पूरग्रस्त व नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाईच्या रकमेचे वाटप जिल्हाभर केले जात आहे. ४८ तास घरात पाणी शिरलेल्या रहिवाशांना नव्या अध्यादेशात नुकसानभरपाईस पात्र ठरवण्यात आले आहे.

पुरामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी १३ मृतांचे परिवार मदतीस पात्र असून, त्यापैकी १२ जणांच्या कुटुंबीयांना ४८ लाखांची मदत शासनाकडून देण्यात आली आहे. उर्वरित १३ मृतांचे नातेवाईक मदतीस पात्र ठरलेले नसल्याचे आढळून आले आहे. ठाणे शहर व तालुक्यात सर्वाधिक १० मृत्यू झाले आहेत. त्यातील सात जणांच्या नातेवाइकांना मदत झाली, तर उर्वरित तिघांच्या नातेवाइकांसाठी मदतीची कारवाई सुरू आहे. याप्रमाणेच कल्याण तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला. त्यांच्यातील तिघांच्या कुटुंबीयांना १२ लाखांची मदत मिळाली. भिवंडीच्या पाचपैकी तिघांच्या कुटुंबीयांना १२ लाख मिळाले. अंबरनाथमध्ये तीन जणांचे मृत्यू झाले असून, त्यापैकी एकास पात्र ठरवून त्याच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत करण्यात आली आहे. उल्हासनगरमध्ये दोघांचा, तर शहापुरात एकाचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना मदतीस अपात्र ठरवल्याचे सांगितले जात आहे.

या आपत्तीत पडझड झालेल्यांमध्ये सुमारे एक हजार ५२० घरे व गोठे आहेत. यातील केवळ ९५५ घरे पात्र ठरवून, त्यापोटी सात लाख ११ हजारांची मदत देण्यात आली आहे. यात पूर्ण पडझड झालेल्या सात घरांचा समावेश आहे. अंशत: पडझड झालेली ५०० पक्की घरे असून त्यापैकी केवळ ९९ घरे मदतीसाठी पात्र ठरली आहेत. कच्ची घरे ९६८ असून त्यापैकी ८१४ पात्र ठरले. पडझड व नष्ट झालेल्या ३९ झोपड्यांना नुकसानभरपाईस पात्र ठरवण्यात आले आहे. गायीगुरांचे चार गोठे बाधित असून ते मदतीस पात्र ठरले आहेत. याशिवाय, १० हजार २७४ खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले. एका सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले. त्यांचे पंचनामे सुरू आहेत. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सहा हजार ८७ कुटुंबे तात्पुरती निराधार झाल्याची नोंद असून, ४७३ व्यक्ती बाधित असल्याचे अहवालात म्हटले आहे. या निराधार व बाधितांना आतापर्यंत ८४ हजारांची मदत करण्यात आली आहे.

तीन महिने आधीच जिल्ह्यात सरासरी ४३७ मिमी जास्त पाऊस

ठाणे : जिल्ह्यात गेल्या वर्षी आॅक्टोबरअखेरपर्यंत सरासरी दोन हजार ४५० मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा तीन महिने आधीच, म्हणजे रविवारपर्यंत सरासरी दोन हजार ८८७.३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन महिने आधीच सरासरी ४३७.३२ मिमी जास्त पाऊस जिल्ह्यात पडला आहे. जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला. रविवारी केवळ ११३ मिमी म्हणजे सरासरी १६.१४ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण दोन हजार २११.३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरी दोन हजार ८८७.३३ मिमी पाऊस पडला. गेल्या वर्षीच्या एकूण पावसापेक्षा जास्त पाऊस तीन महिने आधीच जिल्ह्यात पडल्याचे उघड झाले आहे. ११७.८५ टक्के पाऊस जिल्ह्यात पडला आहे. गेल्या वर्षी शेवटपर्यंत म्हणजे ३१ आॅक्टोबरपर्यंत १७ हजार १५०.१० मिमी पाऊस पडला होता. त्यावेळी सरासरी दोन हजार ४५० मिमी नोंद करण्यात आली होती. या एकूण पावसापेक्षा जास्त पाऊस यावेळी तीन महिने आधीच जिल्ह्यात पडला. अजून तीन महिने पडणाऱ्या पावसाचा विचार करता काही वर्षांच्या तुलनेत यंदा जास्त पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.

Web Title: 26 death's due to rain in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.