ठाण्यात पातलीपाडा ब्रीजजवळ २६ टन पेंटचा ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 20:57 IST2024-08-02T20:56:53+5:302024-08-02T20:57:00+5:30
घोडबंदर रोडच्या पातलीपाडा ब्रिज जवळ ते आल्यावर ट्रक उलटला.

ठाण्यात पातलीपाडा ब्रीजजवळ २६ टन पेंटचा ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी
जितेंद्र कालेकर (ठाणे), लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रिज जवळ २६ टन एशियन पेंट कलर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला होता. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेने दिली.
एशियन पेंट कलरचा ट्रक घेऊन चालक निलेश मस्के हे खंडाळ्यावरून बडोद्याला निघाले होते. घोडबंदर रोडच्या पातलीपाडा ब्रिज जवळ ते आल्यावर त्यांचा ट्रक सकाळी उलटला.
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस , आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत मदतकार्य राबविले. याठिकाणी दोन हायड्रा मशीनच्या मदतीने पलटी झालेला ट्रक रोडच्या एका बाजूला करण्यात आला. दरम्यान, घोडबंदरकडे जाणाऱ्या रोडवर हा अपघात झाल्यामुळे पातलीपाडा ब्रिजच्या खालून जाणारा रोड सकाळी काही काळ वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे पातलीपाडा ब्रिजवरून घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, या अपघातामुळे सुमारे तासभर वाहतूकीवर परिणाम झाल्यामुळे सकाळी ऐन कामावर जाण्याच्या वेळेत ठाणेकरांना कोंडीला सामोरे जावे लागले.