कोरोना रूग्णांसाठी २६ वाहने उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:31 AM2020-07-20T00:31:15+5:302020-07-20T00:31:58+5:30
उल्हासनगरमध्ये रुग्णांची संख्या साडेपाच हजारापेक्षा जास्त झाली असून रूग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी व इतर ठिकाणी हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हत्या.
उल्हासनगर : रुग्णवाहिकाविना रुग्णांचे हाल होऊ नये, यासाठी महापालिकेने रुग्णवाहिकेसह २६ वाहने उपलब्ध करुन दिली आहेत. कोरोना रुग्णालय, क्वारंटाइन सेंटर, महापालिका आदी ठिकाणी तैनात केलेल्या रुग्णवाहिका व वाहनाचा संपर्क नंबरही नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने प्रसिध्द केला आहे.
उल्हासनगरमध्ये रुग्णांची संख्या साडेपाच हजारापेक्षा जास्त झाली असून रूग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी व इतर ठिकाणी हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हत्या. तसेच रुग्णाहिकांची मक्तेदारी निर्माण झाली होती. खाजगी रुग्णवाहिका मालक व चालक हे रुग्ण व नातेवाईकांकडून दुप्पट भाडे वसूल करीत असल्याच्या असंख्य तक्रारी आल्या होत्या.
यातून रुग्ण व नातेवाईकांची सुटका करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी महापालिकेने उभे केलेले कोरोना रुग्णालय, कोविड केंद्र, महापालिका मुख्यालय आदी ठिकाणी १५ रुगवाहिका व ११ बस मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. महापौर लीलाबाई अशान यांनी यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.